गेल्या अनेक दिवसांपासून राजधानी दिल्लीतील जंतर मंतरवर देशातील दिग्गज पैलवानांचे आंदोलन सुरू आहे. अनेक खेळाडूंनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. यातच आता आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी जंतर मंतरकडे जाणाऱ्या गीता फोगटला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आज(दि. 4 मे) राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेती गीता फोगट आणि तिचा पती पवन सरोहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. खुद्द गीता फोगट हिने ट्विट करुन ही माहिती दिली. तिने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'मला आणि माझे पती पवन सरोहा यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. हे खूप दु:खद आहे.’ याआधी तिने ट्विट करत गाडी कर्नाल बायपासवर पोलिसांनी अडवल्याची माहिती दिली होती.
गीता फोगट जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना पाठिंबा देण्यासाठी जात होती. दिल्ली पोलिसांनी दोघांना सिंघू सीमेवर ताब्यात घेतले. यानंतर त्यांना बवाना पोलिस ठाण्यात नेण्यात आले. बुधवारी मध्यरात्री जंतरमंतरवर झालेल्या गोंधळानंतर कुस्तीपटूंसह विविध स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
यापूर्वी गीता फोगटचे वडील आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते महावीर फोगट यांनी न्याय न मिळाल्यास दिल्लीला घेराव घालू, अशी घोषणा केली होती. द्रोणाचार्य पुरस्कार परत करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या लढाईत त्यांची धाकटी मुलगी आणि भाजप नेत्या बबिता फोगटही सोबत असल्याचा दावा महावीर फोगट यांनी केला आहे.