Wrestlers Candle March: गेल्या अनेक दिवसांपासून भारतातील दिग्गज कुस्तीपटूंचेदिल्लीतील जंतर-मंतरवर रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या अटकेच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलक कुस्तीपटूंनी कँडल मार्च काढला. जंतर-मंतर ते इंडिया गेट असा हा कँडल मार्च काढण्यात आला आहे. या मोर्चात अनेक खापही सहभागी आहेत. माजी राज्यपाल सत्यपाल मलिकही कुस्तीपटूंना पाठिंबा देण्यासाठी इंडिया गेटवर पोहोचले आहेत.
कँडल मार्चमध्ये शेतकरी नेते राकेश टिकैतदेखील उपस्थित आहेत. यावेळी कुस्तीपटू बजरंग पुनियाने म्हणाला की, आमच्या बहिणींचा आदर आमच्यासाठी जीवापेक्षा जास्त आहे. जोपर्यंत देशातील मुलींना न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार आहे. या चळवळीला बदनाम करण्याचे काम अनेक लोक करत आहेत, त्यामुळे आपण असेच साथ देत राहावे ही विनंती.
तो पुढे म्हणाला की, भारतावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी सरकारला हा प्रश्न विचारला पाहिजे की, आमचे चॅम्पियन एका महिन्यापासून रस्त्यावर का आहेत? त्यांची जागा रस्ता नसून आखाडा आहे. कुस्तीपटू साक्षी मलिक म्हणाली की, ही देशाच्या मुलींची लढाई आहे, ज्यामध्ये तुम्हा सर्वांना साथ द्यावी लागेल. आज आमच्या आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला, पण आजपर्यंत आम्हाला न्याय मिळण्याची आशा दिसत नाही.