brij Bhushan Singh Statement on Wrestlers Protest । नवी दिल्ली: भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनी आपल्यावरील आरोप पुन्हा एकदा फेटाळून लावले असून कुस्तीपटूंनी केलेला विरोध हे राजकारण असल्याचे म्हटले आहे. तसेच माझ्या पक्षाने राजीनामा द्यायला सांगितल्यास मी राजीनामा देईन असे त्यांनी म्हटले आहे. मी कोणते वाईट काम केले आहे ते सांगावे. सर्वोच्च न्यायालयात खटला चालू आहे, दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे मग मी राजीनामा का देऊ असा प्रश्नही सिंह यांनी विचारला.
आज माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटले, "माझ्यावर काय आरोप आहेत हे देखील मला माहिती नाही. अल्पवीयन मुलींनी मागील काही वर्षांपासून आरोप केले आहेत. चार महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. 'तुकडे तुकडे टोळी', शाहीन बाग, 'किसान आंदोलन' या लोकांचा या आंदोलनात हात असून मी फक्त बहाणा आहे. त्यांचे खरे लक्ष्य मी नसून माझा पक्ष भाजपा आहे, या खेळाडूंना पैसे दिले जातात. शाहीनबागप्रमाणे निषेधाचा विस्तार होत आहे, त्यांना उत्तर प्रदेश आणि हरयाणाचे विभाजन करायचे आहे."
सिंह यांचे गंभीर आरोप
तसेच माझा राजीनामा फक्त बहाणा असून त्यांना भाजपाला लक्ष्य करायचे आहे. त्यांच्या मागणीनुसार एफआयआर दाखल झाला आहे. आंदोलनात विरोधक सहभागी होत आहेत, प्रियंका गांधी, आज त्यांचे पती गेले होते, अरविंद केजरीवाल यांनी देखील हजेरी लावली. काही बिहारमधील लोकांनी मोदीजी आणि योगी यांची खिल्ली उडवली. हे खेळाडूंचे आंदोलन नसून उद्योगपतींचे आंदोलन आहे. उद्योगपती माझ्याविरूद्ध १० कोटी खर्च करत असून माझ्या जीवाला धोका आहे. एक सामान्य खेळाडू कपिल सिब्बल यांसारख्या वकिलांना ५० लाख कसे काय देऊ शकतो? हळू हळू हे आंदोलन शाहीन बागसारखे होत असल्याचा गंभीर आरोप सिंह यांनी खेळाडूंवर केला आहे.
आंदोलनाचा आज नववा दिवस लक्षणीय बाब म्हणजे ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेती साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांसह देशातील ७ नामांकित पैलवानांनी मागील रविवारी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. काल आंदोलनाला आठवडा पूर्ण झाला असून भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू जंतरमंतरवर धरणे आंदोलन करत आहेत. प्रशिक्षक महिलांचा छळ करत आहेत आणि फेडरेशनचे काही जवळचे लोक प्रशिक्षक महिला प्रशिक्षकांशीही गैरवर्तन करतात. ते मुलींचा लैंगिक छळ करतात. भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षांनी अनेक मुलींचा लैंगिक छळ केला आहे, असे गंभीर आरोप महिला पैलवानांनी केले आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"