brijbhushan singh news । नवी दिल्ली: भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा धरणे आंदोलन करत आहेत. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरूद्ध एफआयर दाखल करण्याची मागणी घेऊन पैलवानांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. खरं तर आखाड्याबाहेरील कुस्ती अद्याप सुरू असून विविध राजकीय पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे, पण अद्याप कोणत्याही क्रिकेटपटूंने याबाबत आवाज उठवला नाही. यावरूनच आता ऑलिम्पिक पदक विजेत्या विनेश फोगाटने इतर खेळाडूंना प्रश्न विचारला आहे.
तिने म्हटले, "संपूर्ण देश क्रिकेटची पूजा करत असतो, पण अद्याप एकाही क्रिकेटपटूने आमच्यासाठी आवाज उठवला नाही." विनेश फोगाटने 'ब्लॅक लाइव्स मॅटर' आंदोलनाचे उदाहरण देत म्हटले, "असे नाही की आपल्या देशात मोठे ॲथलीट नाहीत. अनेक क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी अमेरिकेतील ब्लॅक लाइव्स मॅटर आंदोलनाला पाठिंबा दिला होता. आमची तेवढी लायकी नाही का? जेव्हा कुस्तीपटू पदक जिंकतात तेव्हा सर्व क्रिकेटपटू त्यांचे अभिनंदन करण्यासाठी येतात. त्यांच्यासाठी ट्विट करतात, पण आता काय झाले? क्रिकेटपटूंना व्यवस्थेची इतकी भीती वाटते की काही तरी गडबड सुरू आहे?."
आखाड्याबाहेर रंगली 'कुस्ती'याशिवाय विनेशने पीटी उषाच्या वक्तव्याला असंवेदनशील ठरवत आपण संविधानानुसार जगतो आणि स्वतंत्र नागरिक आहोत असे म्हटले आहे. आपण कुठेही जाऊ शकतो. आम्ही बाहेर रस्त्यावर बसलो आहोत तर काहीतरी कारण असावे. आमचे कोणी ऐकले नाही यामागे काही तरी कारण असावे, मग ते भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन असो किंवा क्रीडा मंत्रालय. तसेच मी पीटी उषा यांनाही फोन केला होता, पण त्यांनी फोनही उचलला नाही, असा आरोप यावेळी विनेश फोगाटने केला आहे.
लक्षणीय बाब म्हणजे ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेती साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांसह देशातील ७ नामांकित पैलवानांनी रविवारी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आज आंदोलनाचा सहावा दिवस असून भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू जंतरमंतरवर धरणे आंदोलन करत आहेत. प्रशिक्षक महिलांचा छळ करत आहेत आणि फेडरेशनचे काही जवळचे लोक प्रशिक्षक महिला प्रशिक्षकांशीही गैरवर्तन करतात. ते मुलींचा लैंगिक छळ करतात. भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षांनी अनेक मुलींचा लैंगिक छळ केला आहे, असे गंभीर आरोप महिला पैलवानांनी केले आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"