brijbhushan singh news । नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा धरणे आंदोलन करत आहेत. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरूद्ध एफआयर दाखल करण्याची मागणी घेऊन पैलवानांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. विनेश फोगाट आणि साक्षी फोगाट यांच्यासह सात महिला पैलवानांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
दरम्यान, या कुस्तीपटूंनी त्यांच्या याचिकेत म्हटले आहे की, २१ एप्रिल रोजी दिल्लीतील कॅनॉट प्लेस पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार देऊनही भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष (WFI) ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिला कुस्तीपटूंच्या वतीने वकील नरेंद्र हुडा हे उद्या सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांसमोर लवकर सुनावणीची मागणी करणार आहेत.
FIR दाखल करण्याची मागणी
तसेच दिल्ली पोलिसांनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने स्थापन केलेल्या चौकशी समितीकडून अहवाल मागवला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी याबाबत माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, WFI अध्यक्षांविरुद्ध आतापर्यंत सात तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या सर्वांची चौकशी केली जात आहे. ठोस पुरावे मिळाल्यानंतरच एफआयआर दाखल करण्यात येईल.
लक्षणीय बाब म्हणजे ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेती साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांसह देशातील ७ नामांकित पैलवानांनी रविवारी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस असून भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू जंतरमंतरवर धरणे आंदोलन करत आहेत. प्रशिक्षक महिलांचा छळ करत आहेत आणि फेडरेशनचे काही जवळचे लोक प्रशिक्षक महिला प्रशिक्षकांशीही गैरवर्तन करतात. ते मुलींचा लैंगिक छळ करतात. भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षांनी अनेक मुलींचा लैंगिक छळ केला आहे, असे गंभीर आरोप महिला पैलवानांनी केले आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"