नवी दिल्ली - दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनासाठी बसलेल्या कुस्तीपटूंना पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप करत सोशल मीडियातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. विशेष म्हणजे पोलिसांच्या बळावर हे आंदोलन दपडूनही टाकण्यात आलं. मात्र, आंदोलक पैलवानांनी अद्यापही हार मानली नाही. आज पुन्हा एकदा त्याच त्वेषाने आंदोलक कुस्तीपटून मैदानात उतरले आहेत. आज गंग नदीच्या हरीद्वार येथील घाटावर त्यांनी जिंकलेली पदकं नदीत बुडवण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी ते घाटावरही पोहोचले आहेत. या दरम्यान, माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांनी ट्विट करुन संवादातून मार्ग काढण्याचं आवाहन केलंय.
दिल्लीत आंदोलक पैलवाननांची पोलिसांनी धरपकड केली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. गेल्या महिनाभरापासून ते आंदोलक खासदार बृजभूषणसिंह यांच्या अटकेसाठी आंदोलन करत आहेत. आता, त्यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात, साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांचीही नावं आहेत. या घटनेनंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारला लक्ष्य केलं. आता, अनिल कुंबळे यांनीही ट्विट करुन यावर भूमिका घेतली आहे. तसेच, जे घडलं ते ऐकून निराश झाल्याचंही त्यांनी म्हटलं.
पोलिसांकडून २८ मे रोजी आपल्या पैलवानांसोबत जी घटना घडली, त्यांना ज्या पद्धतीने हाताळले गेले ते ऐकून निराश झालो. योग्य संवादाद्वारे काहीही सोडविले जाऊ शकते. लवकरात लवकर मार्ग निघेल अशी आशा आहे, असे म्हणत माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांनी कुस्तीपटू यांच्या आंदोलनावर परखडपणे भाष्य केलंय. तसेच, कुठल्याही परिस्थितीत यावर चर्चेतून मार्ग निघू शकतो, असे म्हणत एकप्रकारे सरकारला मार्ग काढण्याचं सूचवलं आहे.
दरम्यान, गंगा नदीच्या हरिद्वार येथील घाटावर पैलवान साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाटसह अनेक कुस्तीपटू आपले मेडल गंगा नदीत अर्पण करण्यासाठी पोहोचले आहेत. सोशल मीडियातून या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असून देशासाठी ऑलिंपिक मेडल जिंकणाऱ्या कुस्तीपटूंची ही दुर्दशा पाहून अनेकांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे.