भाजप खासदार कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात दिल्लीत पैलवानांचे आंदोलन सुरू आहे. या संदर्भात आता मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पैलवानांना चर्चेसाठी बोलावले आहे, या संदर्भात त्यांनी ट्विट करुन माहिती दिली. कुस्तीपटूंनी क्रीडामंत्री ठाकूर यांची भेट घेण्याचे मान्य केले आहे. मात्र, वेळ आणि ठिकाण अद्याप ठरलेले नाही.
दिल्लीतील कुस्तीपटूंच्या आंदोलनावर खासदार शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले...
केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी कुस्तीपटूंना चर्चेसाठी बोलावले होते. त्यांनी स्वतः मंगळवारी ट्विट करून ही माहिती दिली. त्यांनी सांगितले होते की, यासाठी मी पुन्हा एकदा कुस्तीपटूंना आमंत्रित केले आहे. याआधी ३ जून रोजी शनिवारी रात्री कुस्तीपटूंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या बैठकीनंतर सरकारने पुन्हा एकदा पैलवानांना त्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी निमंत्रण पाठवले आहे.
यापूर्वी ५ जून रोजी बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट रेल्वेत आपापल्या नोकरीवर परतले होते. मात्र, महिला कुस्तीगीरांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे कुस्तीपटूंनी स्पष्ट केले.
भारतीय किसान युनियन आणि खाप नेत्यांनी पैलवानांच्या समर्थनार्थ ९ जून रोजी जंतरमंतर येथे पुकारलेले आंदोलन रद्द केले आहे. किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी सांगितले की, सरकारने आंदोलक पैलवानांशी चर्चा सुरू केली आहे, अशा परिस्थितीत आम्ही आंदोलन रद्द केले आहे.
राकेश टिकैत म्हणाले की, पैलवान आणि सरकारमधील चर्चेच्या निकालाच्या आधारे पुढील रणनीती ठरवली जाईल आणि आंदोलने केली जातील. हा विरोध कुस्तीपटूंना पाठिंबा देण्यासाठी असल्याचे राकेश टिकैत यांनी सांगितले. त्यामुळे कुस्तीपटूंनी केलेल्या कारवाईच्या आधारे आंदोलनाची पुढील तारीख जाहीर करण्यात येणार आहे.
ब्रिजभूषण सिंहांच्या निवासस्थानी १५ जणांची चौकशी
कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध लैंगिक छळाच्या प्रकरणात दिल्लीपोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला आहे. दिल्लीपोलिसांचे एक पथक सोमवारी रात्री लखनौ आणि गोंडा येथील ब्रिजभूषण सिंह यांच्या घरी पोहोचले. एसआयटीने ब्रिजभूषण सिंहे यांच्या घरी उपस्थित असलेल्या १२ जणांचे जबाब नोंदवले आहेत.
दिल्ली पोलिसांनी पुरावा म्हणून ब्रिजभूषण यांच्या घराची आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या लोकांची नावे, पत्ते आणि ओळखपत्रे गोळा केली आहेत. या चौकशीनंतर पोलिसांचे पथक दिल्लीला परतले. पैलवान विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्या नेतृत्वाखाली सर्व कुस्तीपटूंनी कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन सुरू केलं आहे. महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे.