नवी दिल्ली : नवीन संसद भवनासमोर धडकू पाहणाऱ्या आंदोलक पैलवानांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले अन् विरोधकांनी सत्ताधारी भाजपला लक्ष्य करण्यास सुरूवात केली. खेळाडूंना पोलिसांनी ज्या प्रकारे वागणुक दिली त्यावरून राजकीय नेते मंडळी संताप व्यक्त करत आहेत. राज्यातील नेते यामध्ये खासदार अमोल कोल्हे राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. दिल्लीतील जंतरमंतरवर पैलवांनाच्या आंदोलनस्थळी एकच राडा झाल्याचे पाहायला मिळाले. नवनिर्वाचित संसद भवनासमोर 'महिला महापंचायत' करण्याता इरादा असलेल्या पैलवांनाना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. दिल्ली पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त असताना देखील आंदोलकांनी बॅरिकेट्स काढून संसद भवनाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी ही कारवाई केली.
एकिकडे नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाचा उत्साह साजरा केला जात होता. तर दुसरीकडे आंदोलक पैलवान आखाड्याबाहेरील कुस्ती लढत होते. खरं तर दिल्ली पोलिसांनी पैलवान विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह आंदोलक कुस्तीपटूंना ताब्यात घेतले. अशातच बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने देखील भाजप सरकारला लक्ष्य केले. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रीजभूषण शरण सिंह यांनी महिला पैलवानांचा लैंगिक छळ केला असून त्यांना अटक करा, या मागणीसाठी २३ एप्रिलपासून पैलवान आखाड्याबाहेरील कुस्ती लढत आहेत. दिल्ली पोलिसांनी सिंह यांच्यावर एफआयर दाखल केला असला तरी आम्ही अटकेवर ठाम असल्याची भूमिका आंदोलक पैलवानांची आहे.
स्वरा भास्करचा संतापअभिनेत्री स्वरा भास्करने ट्विटच्या माध्यमातून सरकारला लक्ष्य करताना म्हटले, "आपण कोणाला मतदान केलंय ते पाहा." याशिवाय अभिनेत्रीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सांधुसंतांसोबतचा एक फोटो देखील शेअर केला आहे. तसेच कुस्तीपटूंच्या डोळ्यातील अश्रू दाखवणारा फोटो पोस्ट करून अभिनेत्रीने सरकारवर टीकास्त्र सोडले.
नीरज चोप्रा भावुक
भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने देखील पैलवानांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. हे सर्वकाही पाहून मला वाईट वाटत असल्याचे ऑलिम्पिक चॅम्पियन चोप्राने म्हटले आहे. जंतरमंतर येथील आंदोलस्थळावरून नवीन संसदेच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न करत असताना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कुस्तीपटूंना थांबवले आणि ताब्यात घेतले. नव्या संसदेसमोर महिलांची महापंचायत भरवायची असल्याने कुस्तीपटू नव्या संसदेकडे कूच करण्याचा प्रयत्न करत होते.