नवी दिल्ली : नवीन संसद भवनासमोर धडकू पाहणाऱ्या आंदोलक पैलवानांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिल्लीतील जंतरमंतरवर पैलवांनाच्या आंदोलनस्थळी एकच राडा झाल्याचे पाहायला मिळाले. नवनिर्वाचित संसद भवनासमोर 'महिला महापंचायत' करण्याता इरादा असलेल्या पैलवांनाना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. दिल्ली पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त असताना देखील आंदोलकांनी बॅरिकेट्स काढून संसद भवनाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी ही कारवाई केली.
कुस्तीपटू संगिता फोगाटला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याशिवाय साक्षी मलिकला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रीजभूषण शरण सिंह यांनी महिला पैलवानांचा लैंगिक छळ केला असून त्यांना अटक करा, या मागणीसाठी २३ एप्रिलपासून पैलवान आखाड्याबाहेरील कुस्ती लढत आहेत. दिल्ली पोलिसांनी सिंह यांच्यावर एफआयर दाखल केला असला तरी आम्ही अटकेवर ठाम असल्याची भूमिका आंदोलक पैलवानांची आहे.
जंतरमंतर येथील आंदोलस्थळावरून नवीन संसदेच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न करत असताना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कुस्तीपटूंना थांबवले आणि ताब्यात घेतले. नव्या संसदेसमोर महिलांची महापंचायत भरवायची असल्याने कुस्तीपटू नव्या संसदेकडे कूच करण्याचा प्रयत्न करत आहेत.