७५० रुपये लिहून, २०० देतात; ‘मनरेगा’ मजुरांच्या व्यथेने राहुल गांधींना धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 06:59 AM2024-02-08T06:59:04+5:302024-02-08T06:59:34+5:30
‘मनरेगा’ मजुरांच्या व्यथेने राहुल गांधींना धक्का; भारत न्याय यात्रा ओडिशात
राऊरकेला (ओडिशा) : ‘आम्ही मनरेगाच्या कामावर मजुरी करतो; परंतु आम्हाला वेळेवर त्याचे पैसे मिळत नाहीत,’ अशी खंत जेव्हा मनरेगाच्या मजुरांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी संवादादरम्यान व्यक्त केली तेव्हा त्यांना धक्का बसला. ‘भारत जोडो न्याय यात्रे’निमित्त राज्यात आलेल्या राहुल गांधी यांनी या मजुरांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी स्थानिक महिला मजुरांशी संवाद साधला. ‘कंत्राटदार काम करून घेतात; पण पैसे वेळेवर देत नाहीत. मी ३०-३५ दिवस काम केले. त्यानंतर आता एक वर्ष झाले तरी त्याचे पैसे मिळाले नाही. कंत्राटदार बाहेरून मजूर आणतात, त्यामुळे आम्हाला काम मिळत नाही. डायरीत ७५० रुपये दिल्याची नोंद करतात; पण प्रत्यक्षात २०० रुपयेच देतात,’ अशी खंत एका महिलेने व्यक्त केली. यासंदर्भातील व्हिडीओ काँग्रेसने आपल्या सोशल मीडिया एक्सच्या खात्यावर शेअर केला असून, त्यात हा अन्याय असल्याचे म्हटले आहे. आम्ही त्यांना न्याय मिळवून देऊ, असेही त्यात म्हटले आहे.
भाजप-बीजेडीची भागीदारी
‘ओडिशात भाजप आणि बिजू जनता दलाची (बीजेडी) ‘भागीदारी’ आहे आणि काँग्रेस राज्यातील लोकांचे हित जपण्यासाठी त्यांना विरोध करीत आहे,’ असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केला. ते म्हणाले, ‘तुम्हाला माहीत आहे की नवीन पटनायक ओडिशात भागीदारीचे सरकार चालवतात.
ते दोघेही हातमिळवणी करून काम करतात. मला संसदेत आढळले की बीजेडी भाजपला समर्थन देते. बीजेडीचे लोकही आम्हाला भाजपच्या सांगण्यावरून त्रास देतात. केवळ काँग्रेस पक्षच ओडिशातील लोकांसाठी बीजेडी-भाजप युतीला विरोध करीत आहे.’
३० लाख लोकांचे उपजीविकेसाठी स्थलांतर
‘राज्यातील सुमारे ३० लाख लोक उपजीविकेसाठी इतर राज्यांत स्थलांतरित झाले आहेत, तर ३० कोट्यधीश राज्यांची संपत्ती लुटण्यासाठी येथे ओडिशाच्या बाहेरून आले आहेत,’ अशी टीका राहुल गांधी यांनी केली.