नवी दिल्ली : बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये सैनिक भरतीच्या परीक्षेतील उमेदवारांना फक्त अंतर्वस्त्र घालून परीक्षा देण्यास बाध्य केल्याच्या घटनेचे लोकसभेत तीव्र पडसाद उमटले. उमेदवारांना केवळ अंतर्वस्त्र घालून लेखी परीक्षा देण्यास बाध्य करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी अपना दलाच्या खासदार अनुप्रिया पटेल यांनी केली.शून्य तासात पटेल यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्या म्हणाल्या, देशाच्या इतिहासात यापेक्षा हास्यास्पद आणि लाजिरवाणी परीक्षा होऊच शकत नाही. तुम्ही नोकरी मागणाऱ्या उमेदवारांच्या सन्मानाशी अशाप्रकारे खेळू शकत नाही. याबाबत लष्कराला कठोर निर्देश दिले पाहिजे. भविष्यात परीक्षार्थ्यांसोबत असा व्यवहार होऊ नये याची काळजी घ्यावी आणि यातील दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी. भारतीय जनता पक्षाच्या रमा देवी यांनी त्यांचे समर्थन केले. बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये सैन्य भरतीची प्रक्रिया सुरू आहे. परीक्षेत उमेदवारांना केवळ अंतर्वस्त्र घालून परीक्षा देण्यास सांगण्यात आले होते. त्यांना बनियनसुद्धा घालण्याची मुभा देण्यात आली नाही. परंतु, असा निर्णय कॉपी करणाऱ्या उमेदवारांवर अंकुश ठेवण्यासाठी घेण्यात आल्याचे अहवालाद्वारे सांगण्यात येत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
केवळ अंतर्वस्त्रावर दिली लेखी परीक्षा
By admin | Published: March 10, 2016 2:47 AM