भाजपाकडून सत्याची अपेक्षा ठेवणे चुकीचेच, कर्नाटकात राहुल गांधी यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:40 AM2018-02-11T00:40:15+5:302018-02-11T09:06:23+5:30
भाजपा हा खोटे बोलणाºया मंडळींचा पक्ष असून, त्यांच्याकडून तुम्ही सत्याची अपेक्षा ठेवूच शकत नाही, तरुणांना रोजगार, शेतक-यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव, काळ्या पैशाला आळा, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये अशी सारीच भाजपा व नरेंद्र मोदी यांची आश्वासने खोटी ठरली आहेत, अशी टीका करीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकमधील निवडणूक प्रचाराची शनिवारी सुरुवातच केली.
बेल्लारी : भाजपा हा खोटे बोलणाºया मंडळींचा पक्ष असून, त्यांच्याकडून तुम्ही सत्याची अपेक्षा ठेवूच शकत नाही, तरुणांना रोजगार, शेतक-यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव, काळ्या पैशाला आळा, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये अशी सारीच भाजपा व नरेंद्र मोदी यांची आश्वासने खोटी ठरली आहेत, अशी टीका करीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकमधील निवडणूक प्रचाराची शनिवारी सुरुवातच केली.
कर्नाटकातील निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नसल्या, तरी तिथे काँग्रेस व भाजपा दोघांनीही प्रचार सुरू केला आहे. गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेऊ न कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर टीका केली होती. त्याचा थेट उल्लेख न करताच, सिद्धरामय्या सरकारने राबवलेल्या अनेक विकास कामे व योजनांविषयी बोलताना राहुल गांधी यांनी भाजपाने दिलेली आश्वासने कशी खोटी ठरली, हे नमूद केले.
भाषणाची सुरुवात कानडीतून करून, नंतर हिंदीत भाषण करताना राहुल गांधी यांनी पुन्हा एकवार राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी व्यवहाराचा मुद्दा उपस्थित केला. ही विमाने केवढ्याला विकत घेतली, हे सांगायलाही मोदी सरकार तयार नाही, त्यामुळेच त्यात भाजपा सरकारने घोटाळा केला असल्याची शंका घ्यायला वाव आहे, असे सांगून ते म्हणाले की, त्या व्यवहाराची माहिती देण्याचे आश्वासन आधी सरकारने दिले होते. आता मात्र गोपनीयतेचे कारण पुढे करून जाणीवपूर्वक माहिती लपवली जात आहे.
गेल्या पाच वर्षांत कर्नाटकात विकास कामे व अनेक योजना राबविणारा काँग्रेस पक्ष आणि स्वत:ची आश्वासने न पाळणारा भारतीय जनता पक्ष यापैकी एकाची निवड राज्यातील जनतेने करायची आहे. कर्नाटकातील जनता सूज्ञ आहे. ती पु्न्हा काँग्रेसलाच विजयी करेल, अशी खात्री आपणास आहे, असे सांगून राहुल गांधी म्हणाले की, गुजरातमध्ये २00२ साली झालेल्या दंगली कर्नाटकातील लोकांनी पाहिल्याच आहेत. त्यांना आपल्या राज्यात असे वातावरण निश्चितच नको आहे. बेल्लारीच्या खाणींची लूट भाजपा सरकारच्या काळात कशी झाली, याचा त्यांनी उल्लेख केला. खाणमाफिया रेड्डी बंधू यांना भाजपाचा कसा पाठिंबा होता, हे सर्वांना माहीत झाले आहे. कर्नाटकचे तत्कालिन लोकायुक्त न्या. संतोष हेगडे यांनीही त्यावर ठपका ठेवला होता, असे राहुल गांधी म्हणाले. (वृत्तसंस्था)
बेल्लारीशी जुने नाते
बेल्लारी मतदारसंघाशी आपले जुने नाते आहे, याचा उल्लेख करून देताना राहुल गांधी यांनी आपल्या मातोश्री सोनिया गांधी यांना १९९९ साली येथील जनतेने मोठ्या बहुमताने निवडून दिले होते, याची आठवण करून दिली. बल्लारीतील विधानसभेच्या सर्व ९ जागांवर काँग्रेसच विजयी होईल, असा दावाही त्यांनी केला.