लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ध्वजाराेहण करणे गुन्हा नाही. मात्र, लाल किल्ल्यावरून फेसबुक लाईव्ह करून चूक केल्याची कबुली पंजाबी अभिनेता दीप सिद्धूने दिली आहे. सिद्धूच्या जामीन अर्जावर दिल्लीतील न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी त्याने वकिलांमार्फत न्यायालयात बाजू मांडली. सिद्धूच्या जामीन अर्जावर १२ एप्रिलला पुढील सुनावणी हाेणार आहे.प्रजासत्ताक दिनाला नवी दिल्लीत झालेल्या हिंसाचारप्रकरणी दीप सिद्धूला अटक करण्यात आली हाेती. मात्र, जामीन अर्जावर सुनावणीदरम्यान सिद्धूने सर्व आराेप फेटाळले. त्याच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले, की शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी आंदाेलन केले हाेते. सिद्धू काेणत्याही शेतकरी संघटनेचा सदस्य नाही. त्याने हिंसाचाराला चिथावणी दिलेली नाही. त्याने काेणालाही लाल किल्ल्यावर जाण्यास सांगितले नाही. त्याने जमाव गाेळा करून लाल किल्ल्यावर धडक दिल्याचा काेणताही पुरावा नाही, असा दावा वकिलांनी केला. सिद्धू लाल किल्ल्यावर खूप उशिरा पाेहाेचला हाेता. त्याने साेशल मीडियावर केवळ एक व्हिडिओ टाकला आणि त्यासाठीच त्याला हिंसाचारातील प्रमुख आराेपी ठरविण्यात आले आहे. व्हिडिओ टाकणे चूक हाेती. मात्र, प्रत्येक चूक हा गुन्हा नसताे, असा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केला.पाेलिसांचा दावादीप सिद्धूला दिल्ली पाेलिसांनी ९ फेब्रुवारीला अटक केली हाेती. लाल किल्ल्यावर झेंडा फडकविणाऱ्यांचे सिद्धूने अभिनंदन केले आणि तेथून फेसबुकवरून लाईव्ह व्हिडिओ प्रसारित केला. तलवारी तसेच लाठ्या घेऊन लाल किल्ल्यात प्रवेश करणाऱ्या जमावासाेबत सिद्धूला पाहिले. तसेच त्याने चिथावणीखाेर भाषणे दिल्याचा दावा पाेलिसांनी केला आहे. न्यायालयाने त्याच्या भाषणाच्या भाषांतरित प्रती पुढील सुनावणीला मागविल्या आहेत.
लाल किल्ल्यातून फेसबुक लाईव्ह करणे चूक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2021 4:30 AM