आंध्र प्रदेशातील नांदयाल जिल्ह्यात महिला आणि तिच्या पाकिस्तानी प्रियकराची लव्हस्टोरी समोर आली आहे. पाकिस्तानमधील एका व्यक्तीचं नांदयाल येथील एका महिलेशी राँग नंबरवर बोलणं सुरू झालं. यानंतर दोघे प्रेमात पडले. महिलेचा प्रियकर दुबईमार्गे पाकिस्तानातून भारतात आला आणि लग्न करून एकत्र राहू लागला. यानंतर त्याला बनावट आधार कार्ड आणि पासपोर्ट बनवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.
सध्या पाकिस्तानची महिला सीमा हैदर आणि भारताची अंजू यांची लव्हस्टोरी चर्चेत आहे. याच दरम्यान, आंध्र प्रदेशातील रहिवासी असलेल्या दौलत बी आणि तिच्या पाकिस्तानी प्रियकराची लव्हस्टोरी समोर आली आहे. दौलत बी सध्या तिच्या आई-वडिलांसोबत गदिवेमुला मंडलमध्ये राहत आहे. दौलत बी हिच्या पतीचा मृत्यू झाला होता. यानंतर कुटुंब चालवण्यासाठी तिला खूप कष्ट करावे लागले.
2010 मध्ये दौलत बीला एका चुकीच्या नंबरवरून कॉल आला. दौलतला कॉल रिसिव्ह करता आला नाही. यानंतर फोन परत केला असता पाकिस्तानमधील गुलजार नावाच्या व्यक्तीने तो रिसीव्ह केला. दोघांनी एकमेकांबद्दल विचारले आणि ओळख झाली. हळूहळू दोघेही प्रेमात पडले. गुलजार आपल्या प्रेमासाठी दुबईमार्गे भारतात आला होता. येथे आल्यानंतर दौलत बीने गुलजारबद्दल तिच्या घरच्यांना सांगितले आणि लग्न करण्याबाबत बोलली. दौलत बीच्या सांगण्यावरून घरच्यांनी होकार दिला आणि दोघांनी लग्न केलं.
गुलजार आणि दौलत बी यांचे वैवाहिक आयुष्य दहा वर्षे सुरळीत चालले. गुलजार आंध्र प्रदेशातील नांदयाल जिल्ह्यात चित्रकलेचे काम करतात. तर दौलत बी मजूर म्हणून काम करते. दौलतला चार मुले आहेत. संपूर्ण कुटुंब एकत्र राहत आहे. भारतात राहत असताना पाकिस्तानच्या गुलजार यांना दहा वर्षांत भारताचे आधार कार्ड मिळाले. कुटुंबातील सर्व सदस्यांचे पासपोर्टही बनवण्यात आले. यानंतर गुलजार आपल्या देश पाकिस्तानला जाण्यासाठी विमानतळावर पोहोचला तेव्हा त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.
तपासादरम्यान गुलजार पाकिस्तानी असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. गुलजार याच्यावर पासपोर्ट कायदा, बनावट कागदपत्रे आणि फसवणूक यासह इतर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा निकाल आज म्हणजेच 27 जुलै रोजी सुनावण्यात येणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.