ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30- फ्री इंटरनेट सर्व्हिस आणि कॉल्समुळे रिलायन्स जिओकडे ग्राहक मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. आता जिओ आपली ब्रॉडबँड सेवा लाँच करायला सज्ज झाली आहे. दिवाळीमध्ये जिओ फायबर ब्रॉडबँड सर्व्हिस लाँच केली जाणार आहे. दिवाळीच्या मुर्हुर्तावर ब्रॉडबँड सर्व्हिल द्वारे एक प्रकारे खास गिफ्ट ग्राहकांना दिलं जाणार आहे. 500 रूपयांमध्ये 100 जीबी डेटा रिलायन्सकडून दिला जाणार आहे. सध्या मार्केटमध्ये असलेल्या ब्रॉडबँड सर्व्हिस कंपन्यापेक्षा कमी पैशात दुप्पट डेटा रिलायन्स ग्राहकांना देणार आहे. जिओच्या ब्रॉडबँड सेवेची काही भागात सध्या ट्रायल सुरू आहे. त्यानंतर सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये जिओ ब्रॉडबँड लॉन्च होइल, अशी माहिती मिळते आहे.
"बेल प्लॅननुसार 500 रूपयांमध्ये 100 जीबी डेटा एका महिन्यासाठी असेल. या वर्षाच्या शेवटपर्यंत 100 शहरांमध्ये पोहचण्याचा जिओचा मानस आहे",अशी माहिती सुत्रांकडून मिळते आहे.
जिओ सिमकार्ड जेव्हा मार्केटमध्ये आलं होतं तेव्हा ज्या पद्धतीने त्याची क्रेझ होती तसंच जिओ ब्रॉडबँड सुरू झाल्यावर होइल,असं मत तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जातं आहे.
दुसरीकडे जिओची ब्रॉडबँड सेवा मार्केटमध्ये येण्याआधीच प्रतिस्पर्धी कंपन्यांकडून जिओला टक्कर देण्यासाठी नवीन ऑफर्स दिल्या जात असल्याचं बोललं जातं आहे. जिओकडून सुरू करण्यात येणार असलेल्या ब्रॉडबँड सुविधेला टक्कर देण्यासाठी एअरटेल कंपनीने ब्रॉडबँडच्या प्लॅनवर विशेष ऑफर्सची घोषणा केली आहे. एअरटेल ब्रॉडबँडच्या प्लॅनवर 1000 जीबी बोनस डेटा देण्याचा निर्णय एअरटेलने घेतला आहे. सध्या एअरटेलकडून 899 रूपयात 750 जीबीचा इंटरनेट प्लॅन मिळतो आहे. 1000 जीबी बोनस डेटाची ऑफर 1099 रूपये, 1,299 रुपये आणि 1,499 रुपयांच्या डेटा प्लॅनवर लागू होणार असल्याची माहिती मिळते आहे. एअरटेलकडून सुरू करण्यात आलेल्या या नव्या सुविधेचा संबंध जिओशी जोडला जातो आहे. जिओच्या ब्रॉडबँड सर्व्हिसची चाचपणी काही भागामध्ये करण्यात आली आहे. लवकरच जिओकडून ब्रॉडबँडची सर्व्हिस लाँच केली जाणार आहे. याच पार्श्वभूमिवर एअरटेलने खास ऑफर दिल्याचं बोललं जातं आहे.