हरिश गुप्ता नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) महासंचालकपदी वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. सी. मोदी यांची शरद कुमार यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नेमणुकीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मंजुरी दिली आहे. शरद कुमार यांची मुदत ३१ आॅक्टोबर रोजी संपत आहे. कामकाजाची माहिती करून घेण्यासाठी, वाय. सी. मोदी हे येत्या दोन-चार दिवसांत विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) म्हणून एनआयएमध्ये दाखल होणार आहेत.२००२ मधील गुजरात दंगलीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकात मोदी होते. मोदी हे १९८४ च्या आसाम-मेघालयातील आयपीएस अधिकारी आहेत. ते सीबीआयमध्ये विशेष संचालकपदी आहेत.जुलै २०१३ मध्ये शरद कुमार यांची ‘एनआयए’चे महासंचालक (डीजी) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दहशतवादाशी संबंधित प्रकरणांच्या चौकशीसंदर्भातील लक्षणीय कामगिरी पाहून, मोदी सरकारने त्यांना दोनदा मुदतवाढदिली होती.> शरद कुमार यांच्या कारकीर्दीत ‘एनआयए’ने जम्मू-काश्मिरात वस्तू विनिमयाच्या नावाखाली चालणारे मोठे हवाला व्यवहार उघड केले, तसेच पठाणकोटमधील दहशतवादी हल्ल्यासह अन्य दहशतवादी घटनांचा तपासही त्यांच्यावर सोपविण्यात आला होता. एनआयएमधील त्यांची एकूणच कामगिरी पाहता. शरद कुमार यांना निवृत्तीनंतर महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.
वाय. सी. मोदी ‘एनआयए’चे प्रमुख, शरद कुमारांना मोठी जबाबदारी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 4:05 AM