आंध्र प्रदेश सरकारमध्ये मोठी घडामोड घडणार आहे. यामध्ये ९ किंवा ११ एप्रिलला मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांच्या मंत्री मंडळातील बहुतांश मंत्री राजीनामा देणार आहेत. रेड्डी यांनी या मंत्र्यांची यादी राज्यपालांकडे सोपविली आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन यांच्या मंत्रिमंडळात एकूण २४ मंत्री आहेत. यापैकी तीन ते चारच मंत्री आपल्या मंत्रिपदी कायम राहणार असल्याचे समजते आहे. यामुळे जवळपास २० मंत्री राजीनामा देणार आहेत. अंतिम यादी रेड्डी यांनी राज्यपालांकडे सोपविल्याने मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे.
रेड्डी यांनी हा निर्णय घेण्याआधीच दिल्लीत भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी राज्यात सुरु असलेल्या विकास योजनांच्या स्थितीवर चर्चा केली होती. राज्यात परतताच त्यांनी मंत्रिमंडळात मोठेफेरबदल करण्याचा निर्णय घेतला. आता कोणाचे मंत्रिपद जाणार आणि कोण राहणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
याचबरोबर हे नवे २० मंत्री कोण असतील, कोणाला कोणते खाते मिळेल याबाबतही उत्सुकता लागून राहिली आहे. 8 जून 2019 ला रेड्डी यांच्या या मंत्रिमंडळाने शपथ घेतली होती. त्यानंतर हा मोठा बदल असणार आहे. पुढील वर्षी निवडणूक असेल, यामुळे रेड्डी यांनी नव्या चेहऱ्यांना स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे.