भूवनेश्वर – यास च्रकीवादळाच्या तडाख्यामुळे ओडिसा किनारपट्टीवर प्रचंड नुकसान झालं आहे. ‘यास’मुळे समुद्रात अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी NDRF टीम तत्परतेने बचाव कार्यात उतरली आहे. बुधवारी एनडीआरएफच्या जवानांनी राज्यातील जगतसिंहपूर येथे एक अभूतपूर्व शोध मोहिम यशस्वी रित्या पार पाडली. यात १० जणांना वाचवण्यात NDRF जवानांना यश आलं.
चक्रीवादळाच्या तडाख्यात एक बोट नदीत बुडाली तेव्हा NDRF नं प्रसंगावधान राखत एक मोठं ऑपरेशन हाती घेत अंधारात सर्व जणांचे प्राण वाचवले. या ऑपरेशन दरम्यान एनडीआरएफच्या जवानांकडे सुरक्षेसाठी केवळ लाईफ सेविंग बोट आणि टॉर्च इतकचं होतं. रात्रीच्या अंधारात एक बोट नदीत बुडाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. रात्रीची वेळ असल्याने रेस्क्यू ऑपरेशन करणं कठीण काम होतं. परंतु NDRF टीम घटनास्थळी पोहचली आणि त्यांनी ऑपरेशन हाती घेतलं.
एका मच्छिमाराच्या सूचनेनंतर तातडीने पोलीस आणि NDRF टीम याठिकाणी पोहचून रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात केली. त्यावेळी एनडीआरएफ टीमकडे केवळ एक टॉर्च होती त्याआधारे त्यांनी नदीत लोकांना शोधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर NDRF टीमच्या प्रयत्नानंतर १० लोकांना नदीतून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या ऑपरेशनचं कौतुक करत त्याचा व्हिडीओही पोस्ट केला. मुख्यमंत्री नवीन पटनायक म्हणाले की, नदीत बुडालेल्या एका बोटीतील प्रवाशांना वाचवण्यासाठी रात्रीच्यावेळी NDRF टीमनं शोध मोहिम केली. त्यांच्या या कार्यामुळे १० जणांचे जीव वाचले. त्यांच्या या शौर्याचं कौतुक करायलाच हवं.