नवी दिल्ली : भाजपचे अध्यक्ष अमित शहा केंद्रीय मंत्रिमंडळात दाखल झाल्यामुळे भाजपचा नंतरचा अध्यक्ष कोण यावरून पक्षात संघर्ष सुरू झाला आहे. या पदासाठी पहिल्या रांगेतील दावेदार भूपेंद्र यादव आणि जे. पी. नद्दा यांची नावे घेतली जात आहेत. अध्यक्षपदासाठी अनोळखी चेहराही दिला जाऊ शकतो, अशीही चर्चा आहे.
नद्दा यांना नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची पसंती मानली जाते. त्यांच्याकडे लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशची महत्वाची जबाबदारी होती. ज्या पद्धतीने विश्वासू व्यक्तीचा शोध अध्यक्षपदासाठी घेतला जात आहे त्यावरून नद्दा यांना भूपेंद्र यादव यांच्याकडून जोरदार टक्कर होऊ शकते. याचे कारण हे आहे की, बिहारच्या रणांगणात भूपेंद्र यादव यांनी आपल्या संघटन कौशल्याने प्रभावीत करून टाकले आहे. याचबरोबर पक्षात त्यांची शक्ती वाढत चालल्याचेही हे संकेत आहेत.
यावेळी बिहारमधून नित्यानंद राय यांना मंत्रिमंडळात स्थान दिले गेले आहे. तिकीट वाटपावेळी गिरीराज सिंह यांनी थेट आरोप केला होता की, माझा लोकसभा मतदारसंघ बदलण्यामागे नित्यानंद राय आणि भूपेंद्र यादव यांचा हात आहे.
हे दोघेही यादव समुदायाचे असून त्यांनी मिळून त्यांचा लोकसभा मतदारसंघ बदलला होता. या गंभीर आरोपांनंतरही नित्यानंद राय ज्या पद्धतीने मंत्रिमंडळात आले आहेत त्यावरून संकेत मिळतात की, भूपेंद्र यादव पक्षासाठी विश्वासपात्र आहेत. आरोपांमुळे त्यांच्या ताकदीवर काही परिणाम झालेला नाही.