पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री व राजदचे प्रमुख लालुप्रसाद यादव यांच्या तेजस्वी व तेजप्रताप या दोन मुलांचे आपसात अजिबात पटत नाही, हे आता उघडचे झाले आहे. आपले बंधू तेजस्वी यांच्या आसपास चापलुसांची संख्याच मोठी आहे, ते सारे बॅक्टेरिया आहेत. असे सांगून पक्षाच्या उमेदवारांविरोधात उमेदवार उतरवण्याचे तेजप्रताप यांनी जाहीर केले आहे.
तेजप्रताप हे लालुप्रसादांचे मोठे पुत्र आहेत. पण पक्षाची सारी सूत्रे तेजस्वी यादव यांच्याकडे आहेत. कदाचित त्याचा रागही तेजप्रताप यांना असावा, असे समजते. तेजप्रताप म्हणाले की, दात खराब झाले की, डॉक्टर इंजेक्शन देतात, बॅक्टेरिया काढून टाकतात. तसेच पक्षात निर्माण झालेले चापलूस, बॅक्टेरिया यांना संपवण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. तेजप्रताप यांनी लालू-राबडी मोर्चा नावाची संघटनाच स्थापन केली आहे. शिवहर व जहानाबाद या मतदारसंघांत आपल्या समर्थकांना उमेदवारी मिळावी, अशी तेजप्रताप यांची इच्छा होती. पण ती पूर्ण न झाल्याने त्यांनी बंडाचे निशाण हाती घेतले आहे. तेजप्रताप यांचे सासरे चंद्रिका प्रसाद राय यांना सारणमधून उमेदवारी दिली आहे. त्यामुळेही तेजप्रताप संतापले आहेत. ते म्हणाले की, तेथून आपली आई राबडी हिने निवडणूक लढवावी, अशी मी विनंती केली होती. ती लढवणार नसल्यास मी तेथून उभा राहेन, असेही आईला सांगितले होते.पत्नी घरी, पण ‘हे’ घराबाहेरचंद्रिकाप्रसाद राय यांची कन्या ऐश्वर्या हिच्याशी तेजप्रताप यांचा विवाह झाला. पण तो सहा महिनेही टिकला नाही.सध्या ऐश्वर्या सासरी म्हणजे राबडीदेवी यांच्यासमवेत राहते. तेजप्रताप मात्र घरी राहत नाहीत. त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न लालुप्रसाद यादव यांनी केला. पण त्यात यश आल्याचे दिसत नाही.