नवी दिल्ली : मार्च १९९३मध्ये मुंबईत झालेल्या भीषण बॉम्बस्फोटांच्या कटातील मुख्य सूत्रधार याकूब अब्दुल रझाक मेमन याने केलेली फेरविचार याचिका फेटाळून सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या फाशीच्या शिक्षेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले.विशेष न्यायालयाने दिलेल्या निकालाविरुद्ध याकूब मेमनने केलेले अपील फेटाळून सर्वोच्च न्यायालयाने २१ मार्च २०१३ रोजी त्याची फाशीची शिक्षा कायम केली होती. त्याविरुद्ध त्याने केलेली फेरविचार याचिकाही न्या. अनिल आर. दवे, न्या. जे. चेलमेश्वर आणि न्या. जोसेफ कुरियन यांच्या खंडपीठाने फेटाळली. २५७ निरपराध नागरिकांचे बळी घेणाऱ्या या पाकिस्तान पुरस्कृत भीषण दहशतवादी कृत्याबद्दल भारतीय न्यायव्यवस्थेने मृत्युदंड दिलेला याकूब मेमन हा एकमेव आरोपी आहे. मूळ खटल्यात विशेष न्यायालयाने मेमनसह एकूण १२ आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली होती. मात्र अपिलात सर्वोच्च न्यायालयाने मेमन वगळता इतर आरोपींची फाशी रद्द करून त्यांना जन्मठेप ठोठावली होती. मेमनचा दयेचा अर्जही राष्ट्रपतींनी याआधीच फेटाळला आहे. खरेतर, याकूबची सर्वोच्च न्यायालयातील फेरविचार याचिकेची दुसरी इनिंग्ज होती. पूर्वीच्या प्रथेनुसार फेरविचार याचिकांवर न्यायमूर्तींच्या दालनात अत्यंत त्रोटक सुनावणी व्हायची. परंतु फाशीच्या शिक्षेविरुद्ध केल्या जाणाऱ्या फेरविचार याचिकांची सुनावणी त्रिसदस्यीय खंडपीठाने खुल्या न्यायालयात करावी, असा निकाल पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने दिला. त्यानुसार ज्यांच्या फेरविचार याचिका फेटाळल्या गेल्या आहेत; पण ज्यांच्या फाशीची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही अशा याकूबसह इतरांना नव्याने फेरविचार याचिका करण्याची संधी मिळाली. या सर्व कायदेशीर डावपेचांचा आधार घेत विशेष न्यायालयाने ठोठावलेली फाशी टाळण्यात याकूबला गेली सात वर्षे यश आले आहे. आता ‘क्युरेटिव्ह पिटिशन’च्या नावाखाली तो आणखी किती वेळ काढू शकतो ते पाहायचे.
याकूबची फाशी पुन्हा कायम
By admin | Published: April 10, 2015 4:56 AM