याकुबला फासावर लटकवा... पिडीत कुटुंबियांचा आवाज : दादरमध्ये स्वाक्षरी मोहीम अवघ्या तीन तासांत तीन हजार नागरीकांचा पाठिंबा
By admin | Published: July 29, 2015 12:42 AM
याकुबला फासावर लटकवा...
याकुबला फासावर लटकवा... पिडीत कुटुंबियांचा आवाज : दादरमध्ये स्वाक्षरी मोहीमअवघ्या तीन तासांत तीन हजार नागरीकांचा पाठिंबामुंबई : वयाच्या तेराव्या वर्षी १९९३च्या बॉम्ब स्फोट मालिकेत आईला गमावणार्या तुषार देशमुख या तरूणाला याकुब मेमनला फासावर लटकव या मागणीसाठी रस्त्यावर उतरावे लागले. मंगळवारी तुषारने शिवाजी पार्क परिसरात याकुबच्या फाशीसाठी स्वाक्षरी मोहिम राबवली. अवघ्या काही तासात हजारो नागरिकांनी त्यावर सही करून याकुबला या टप्प्यावर कोणतीही दया न दाखवता फासावर लटकवा ही तुषारची भुमिका मान्य केली.दादर परिसरात तुषार आई वडीलांसह रहायचा. १२ मार्च १९९३चा दुर्दैवी दिवस त्याच्या आयुष्यात आला आणि त्याचे सारे जीवनच विस्कळीत झाले. सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत जाताना आईने दिलेला जेवणाचा डब्बा अखेरचा ठरला. आई महालक्ष्मी येथील जिंदाल कॅन्टीनमध्ये काम करत होती. त्या दिवशी ती कामावर गेली ती परत आलीच नाही. मी शाळेतून घरी आलो आणि आईची वाट पाहात बसलो. पण दुसर्या दिवशी आईचा मृतदेहच घरी आला...डोळयांमधून ओघळणारे अश्रु पुसत पुसत तुषार तो काळ सांगत होता.आई गेल्याने जबरदस्त धक्का बसला होता. त्यातून सावरतो न सावरतो तोच बाबांनी दुसरा धक्का दिला. त्यांनी दुसरे लग्न केले. त्यांच्या नव्या संसारात मी कुठेच नव्हतो. वडील असूनही मी अनाथ झालो होतो. तेव्हा शेजारी राहाणार्या योगेश म्हात्रे या मित्राने मला आसरा दिला. योगेशच्या आईने मला पंखाखाली घेतले, मुलासारखा सांभाळ केला, तुषार पुढे सांगत होता.बॉम्बस्फोट घडवून माझे आयुष्य उध्वस्त करणार्या आरोपींना न्यायालयाने शिक्षा दिली. याकुब त्यापैकीच एक. शिक्षा ठोठावून ८ वर्षे लोटली तरी शिक्षेची अमलबजावणी होती नव्हती. माझ्याप्रमाणेच अनेक कुटुंबे त्या अमलबजावणीची वाट पाहात होते. अखेर तो दिवसही ठरला. पण या टप्प्यावर याकुबला फासावर लटकावू नका, त्याला दया दाखवा असा गळा काहींनी काढला. समोर आलेल्या पुराव्यांनुसार याकुबला टाडा न्यायालयाने फाशी ठोठावली. पुढे सर्वोच्च न्यायालयानेही ती कायम केली. असे असताना फाशीचा विरोध करणे म्हणजे देशाच्या न्यायव्यवस्थेचा अपमान करण्यासारखे आहे. शिवाय याकुबला दया दाखवल्यास त्या बॉम्बस्फोटांमध्ये ठार-जखमी झालेल्यांच्या नातेवाईकांच्या भावनांचाही घोर अपमान आहे, असेही तुषार सांगतो. बॉम्बस्फोट मालिका घडविण्यासाठी लागणारे साहित्य असो अथवा आरोपींना पैसा पुरविण्याचे काम याकुबने केले. जर त्याने हे काम केलेच नसते तर बॉम्बस्फोट मालिका घडली नसती. त्यामुळे याकुबला फाशी झालीच पाहीजे, असे त्याचे म्हणणे आहे. यासाठी शिवाजी पार्क परीसरात सायंकाळी पाच वाजल्यापासुन त्याने स्वाक्षरी मोहीम राबविली. या मोहीमेला तब्बल तीन तासांत तीन हजाराहून अधिक नागरीकांनी पाठिंबा दिला. राज्यपालांकडे सादर केल्या सह्यामंगळवारी त्याने हा अहवाल राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्याकडे सादर केला. मुळात या माध्यमातून मी जनतेचा आवाज राज्यपालांकडे पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ते यावर काय भूमिका घेतात हे याकडे माझ्यासोबत सर्वांचेच लक्ष लागले आहे, असे तुषार सांगतो.