ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील फाशीची शिक्षा दोषी याकूब मेमनची फाशी काही काळ लांबणीवर पडणार असल्याचे वृत्त आहे. याकूबने आपल्याला न्याय मिळण्यासाठी उपलब्ध असलेले सर्व कायदेशीर पर्याय वापरण्याच्या आधीच डेथ वॉरंट काढून न्याय व्यवस्थेने अन्याय केल्याची याचिका केली आहे. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली त्यावेळी याकूबच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादानंतर दोन न्यायाधीशांमध्येच मतभेद झाल्याने सरन्यायाधीशांनी तीन न्यायमूर्तींचे खंडपीठ नेमण्याचा निर्णय घेतला असून या खंडपीठासमोर उद्या २९ जुले रोजी सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे न्यायालयाच्या आदेशांनुसार महाराष्ट्र सरकारने ३० जुलै हा याकूबच्या शिक्षेसाठी निश्चित केलेला दिवस आहे. त्यामुळे उद्या सर्वोच्च न्यायालयाचे त्रिसदस्यी खंडपीठ काय भूमिका घेते हे महत्त्वाचे ठरणार आहे.
त्यामुळे याकूबची फाशी रद्द जरी झाली नाही तरी काही दिवसांसाठी लांबणीवर पडू शकते असे मत व्यक्त होत आहे.
याकूब मेमनला ३० जुलै रोजी फासावर लटकवण्यात येणार होते, मात्र याकूबने कायद्यातील तरतुदींचा आधार घेत फाशीच्या शिक्षेच्या अमलबजावणीचा आदेश योग्य त्या प्रक्रिया पार न पाडता केल्याचा आरोप केला आणि सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. त्यावर सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान न्या. दवे व न्या. जोसेफ यांच्यात मतभेद झाले. न्या. दवे यांनी डेथ वॉरंटला स्थगिती देण्यास विरोध दर्शवला तर न्या. जोसेफ हे फाशीला स्थगिती देण्याच्या निर्णयाच्या बाजूने होते. दोन न्यायाधीशांमधील मतभेदांमुळे सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका तीन सदस्यांच्या खंडपीठाकडे सोपवण्याचा निर्णय घेतला असून याप्रकरणी आता उद्या पुन्हा सुनावणी होईल.