ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनची फाशीच्या शिक्षेविरोधात दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरूवारी फेटाळून लावली असून त्याची फाशची शिक्षा कायम राहणार आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी याकूबचा दयेचा अर्ज यापूर्वीच फेटाळून लावला आहे.
गेल्यावर्षी न्यायालयाने मेमनच्या फाशीला हंगामी स्थगिती दिली होती. त्याप्रकरणी आज झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालायाने त्याने शिक्षेसंदर्भात दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळली. याकूब मेमन हा १९९३ सालच्या बॉम्बस्फोटांमागील सूत्रधार व फरार आरोपी टायमगर मेमन याचा भाऊ आहे. याकूबला टाडा न्यायालयाने २००७ साली फाशीची शिक्षा सुनावली होती. मार्च २०१३ साली झालेल्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयानेही ‘टाडा‘ न्यायालयाचा निर्णय कायम राखला होता. त्यानंतर ऑक्टोबर २०१३ मध्ये याकूब मेमनने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज दाखल केला होता. राष्ट्रपतींनीही त्याचा दयेचा अर्ज फेटाळला होता. त्यामुळे त्याने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती व आज न्यायालयाने ती फेटाळून लावली.