दिल्लीकरांसाठी आजची रात्र वैऱ्याची ठरण्याची शक्यता आहे. यमुनेने धोक्याची पातळी ओलांडली असून दिल्लीत रात्रभरात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती सतावू लागली आहे. यमुनेने रात्री ८ वाजताच 205.76 ही धोक्याची पातळी ओलांडली आहे. आता ही पातळी 207.49 मीटरवर गेल्याचे वृत्त आहे.
हत्तीकुंडातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्याने दिल्लीत पाणी घुसले आहे. सोमवारी पहाटे तीन वाजता ३०९५२६ क्युसेक पाणी सोडण्यात आले होते. यानंतर सलग दोन तास तीन लाख क्युसेकहून अधिक पाणी सोडण्यात आले. महसूल मंत्री आतिशी यांनी बोटीतून अधिकाऱ्यांसह यमुनेच्या विविध भागांची पाहणी केली. रेल्वे प्रशासनही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
रविवारी सकाळपर्यंत हथिनी कुंडातून ४५ हजार क्युसेक पाणी सोडले जात होते, ते वाढून तीन लाख क्युसेक झाले आहे. यामुळे दिल्लीतील यमुनेच्या पाण्याची पातळी आणखी वाढू शकते. यमुनेच्या खालच्या भागात सुमारे 40 हजार लोक राहतात. त्यांना सुरक्षित स्थळी पाठवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.