नवी दिल्ली: हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या डोंगराळ भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दिल्लीत यमुना नदीने पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडली आहे. केंद्रीय जल आयोगाच्या वेबसाइटनुसार, जुन्या रेल्वे पुलावरील पाण्याची पातळी सोमवारी दुपारी ३ वाजता २०३.४८ मीटरवरून मंगळवारी संध्याकाळी ६ वाजता २०४.९४ मीटरपर्यंत वाढली. रात्री ८ वाजेपर्यंत पाण्याची पातळी २०५.१२ मीटरवर पोहोचली.
दिल्ली सरकारच्या पाटबंधारे आणि पूरनियंत्रण विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, नदीकाठी काही ठिकाणी निम्न-स्तरीय पूर येऊ शकतो, परंतु गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही. याआधी सोमवारी, हरियाणाच्या यमुनानगरमधील हथिनीकुंड बॅरेजमध्ये सकाळी ९ वाजता प्रवाह दर ७५,००० क्युसेकवर पोहोचला, जो २६ जुलैनंतरचा उच्चांक आहे. दिल्ली सरकारच्या पाटबंधारे आणि पूर नियंत्रण विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. पाण्याची पातळी वाढू शकते. परंतु गंभीर परिस्थिती संभवत नाही.
जुलै महिन्यात पुरामुळे माजला होता हाहाकार-
दिल्ली आणि डोंगरारभारात झालेल्या मुसळधार पावसामुळे जुलैच्या मध्यात दिल्लीला भीषण पुराचा सामना करावा लागला. १३ जुलै रोजी यमुना नदीने विक्रमी २०८.६६ मीटर उंची गाठली आणि पूर्वीचे विक्रम मोडले. गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत पुराचे पाणी शहरात अधिक खोलवर शिरले होते. पूरग्रस्त भागातून २७००० हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. मालमत्ता, व्यवसाय आणि कमाईच्याबाबतीत कोट्यवधी रुपयांपर्यंत नुकसान झाले आहे.