नवी दिल्ली: उत्तर भारतात मुसळधार पावसामुळं महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशाची राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणामध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुरामुळं अनेक भाग पाण्याखाली गेले, असून लोकांना घर सोडून इतर ठिकाणी हलवण्यात येत आहे.
यमुनेच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने दिल्लीकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या आठवड्यातही दिल्ली-एनसीआरमध्ये पाऊस पडेल आणि १५-१६ तारखेला पावसाचा यलो अलर्ट आहे. यमुनेच्या वाढत्या जलपातळीने ४५ वर्षांचा विक्रम मोडला आहे. आज दुपारी २ वाजता नदीची पाणीपातळी २०७.५५ मीटरवर पोहोचली. यापूर्वी १९७८ मध्ये नदीची पाणीपातळी २०७.४९ मीटरवर पोहोचली होती. यमुनेच्या वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे दिल्लीतील लोकांच्या अडचणी वाढत आहेत. नदीचे पाणी नोएडा-दिल्ली लिंक रोडपर्यंत पोहोचले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तातडीने बैठक बोलावली आहे.
गेल्या २४ तासांत आणखी १६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी ८ मृत्यू उत्तराखंडमध्ये तर चार मृत्यू यूपीमध्ये झाले आहेत. हिमाचलमध्ये तीन दिवसांत ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. जम्मू-श्रीनगर महामार्ग, मनाली-लेह, मनाली-चंदीगड राष्ट्रीय महामार्गासह १५०० हून अधिक रस्ते भूस्खलनामुळे बंद झाले आहेत. हरियाणा आणि पंजाबमध्ये तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कोट्यवधींच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. दोन्ही राज्यांमध्ये अनेक घरे पाण्याखाली गेली असून पिकांचे नुकसान झाले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. रुपनगर, पटियाला, मोहाली, अंबाला आणि पंचकुला यासह बाधित जिल्ह्यांमध्ये मदतीसाठी केंद्र उभारण्यात आली आहेत. पंजाबमधील सर्वाधिक प्रभावित रुपनगर जिल्ह्यात एनडीआरएफच्या पाच टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, यमुना खोऱ्यातून बाहेर काढलेल्यांसाठी चिल्ला ते एनएच २४ डीएनडी ते निजामुद्दीन फ्लायओव्हर आणि यमुना बँक ते आयटीओ ब्रिजपर्यंत मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत. येथे खाण्यापिण्याची व्यवस्था आहे. मदत गटांनी वैद्यकीय शिबिरेही लावली आहेत. रात्री बाहेर काढलेल्या लोकांना सकाळी नऊच्या सुमारास येथे जेवण देण्यात आले आणि दुपारी दीडच्या सुमारास तंबू उभारण्यात आले. नोएडा-दिल्ली लिंक रोडवर सुमारे १००० मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत. याठिकाणी फिरती शौचालये बसविण्याची तयारी सुरु केली आहे.