नवी दिल्ली: सध्या उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं उत्तरेकडील राज्यांमध्ये पूरस्थिती कायम आहे. दिल्ली आणि हिमाचल प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये परिस्थिती गंभीर होत असल्याने लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हरियाणातील हथिनीकुंड बॅरेजमधून पाणी सोडल्याने यमुनेच्या पाण्याची पातळी वाढली आहे. या मुसळधार पावसाने पुराचे पाणी काढण्यास जास्त वेळ लागत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
काल संध्याकाळपासून दिल्लीत पुन्हा एकदा पाऊस सुरु झाल्याने अनेक ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी आणि पाणी साचले. तर आयटीओ आणि राजघाटसह शहरातील प्रमुख भाग पाण्याखाली गेले. आज सकाळपासूनच दिल्लीतील अनेक भाग दाट ढगांनी व्यापले आहेत. आजही पाऊस पडला तर दिल्लीतील यमुनेच्या काठावरील भागात पुराचे स्वरूप आणखी बिकट होऊ शकते. आज सकाळीही येथील अनेक भागांना पुराचा फटका बसला आहे. यमुनेची पाण्याची पातळी आता २०६.०८ मीटर आहे. जे काही दिवसांपूर्वीच्या सर्वोच्च पातळीपेक्षा अडीच मीटरने खाली आहे.
सध्या यमुना नदी धोक्याच्या चिन्हावरुन वाहत आहे. यमुनेतील धोक्याची पातळी २०५.३३ मीटर आहे. त्याचबरोबर यमुना बाजार, आयटीओ, लाल किल्ला, काश्मिरी गेट या परिसरात पाणी साचले आहे. एनडीआरएफच्या १६ तुकड्या बाधित भागात तैनात आहेत. एनडीआरएफच्या पथकांनी दिल्लीत आतापर्यंत १५००हून अधिक लोकांना वाचवले आहे. तसेच ६०००हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले आहे. आयटीओजवळील यमुना पुलाचे जाम झालेले गेट उघडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये लष्कर आणि नौदल मदत करत आहे.
हथिनीकुंडातील पाणी दिल्लीकडेच कसे?
दिल्लीत आलेल्या महापुरासाठी जबाबदार कोण यावरून आम आदमी पार्टी आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहे. मार्गदर्शक तत्त्वांना बाजूला ठेवून हथिनीकुंडातील पाणी केवळ दिल्लीकडे येणाऱ्या पूर्व कालव्यातून सोडण्यात आल्याचा आरोप जलपुरवठामंत्री सौरभ भारद्वाज यांनी केला. हरयाणा आणि हिमाचल प्रदेशातून आलेल्या पुरामुळे दिल्लीतील यमुनेला पूर आला. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून हथिनीकुंडातून कशा पद्धतीने पाणी सोडले जाते, याची चौकशी व्हायला हवी, असे महसूलमंत्री आतिशी म्हणाल्या.