नवी दिल्ली : देशाच्या नवीन राष्ट्रपती पदासाठी 18 जुलै रोजी निवडणूक होणार आहे, मात्र सर्वांच्या नजरा राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांवर आहेत. अशा स्थितीत यशवंत सिन्हा हे विरोधी पक्षाकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असू शकतात. यशवंत सिन्हा आज दिल्लीत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या निवडीसाठी विरोधकांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीला येण्यापूर्वी यशवंत सिन्हा यांनी ट्विट केले की, ममता बॅनर्जी यांनी मला तृणमूल काँग्रेसमध्ये जो सन्मान आणि प्रतिष्ठा दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आता अशी वेळ आली आहे की, एका मोठ्या राष्ट्रीय हेतूसाठी मी पक्ष सोडून विरोधी ऐक्यासाठी काम केले पाहिजे. मला खात्री आहे की, पक्ष माझा निर्णय मान्य करेल.
तृणमूल काँग्रेस आज होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीत राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून यशवंत सिन्हा यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तृणमूल काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी या विषयावर चर्चा केल्यानंतर यशवंत सिन्हा यांनी या प्रस्तावाला सहमती दर्शविली आहे. दुसरीकडे, यशवंत सिन्हा यांनी बैठकीपूर्वी केलेल्या ट्विटमध्ये मोठ्या राष्ट्रीय कारणांमुळे पक्षाच्या कामातून माघार घेण्याची घोषणा केली आहे. यासह त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.
शरद पवार, फारुख अब्दुल्ला आणि गोपाळ कृष्ण गांधी यांनी विरोधकांचा राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचा प्रस्ताव धुडकावला आहे. महात्मा गांधी यांचे नातू गोपाळ कृष्ण गांधी यांनी सोमवारी राष्ट्रपतीपदासाठी आपले नाव सुचवल्याबद्दल विरोधी पक्षनेत्यांचे आभार मानले आणि निवडणूक न लढण्याची इच्छा व्यक्त केली. अशा स्थितीत आता विरोधक यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देऊ शकतात. यातच यशवंत सिन्हा यांनी ट्विट करून या चर्चांना हवा दिली आहे. दरम्यान, यशवंत सिन्हा यांनी भाजप सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.