उरी दहशतवादी हल्ल्यानंतरच्या सर्जिकल स्ट्राईकचे आणि पुलवामा हल्ल्यानंतरच्या एअर स्ट्राईकचे 'मास्टरमाईंड' अजित डोवाल यांना मोदी सरकार - 2 ने मोठी भेट दिली आहे. आणखी पाच वर्षं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जाही दिला आहे. डोवाल यांची चाणाक्ष बुद्धिमत्ता आणि धाडसी वृत्तीचा अनुभव सगळ्यांनाच आल्यानं केंद्राच्या निर्णयाचं कौतुक होतंय. परंतु, भाजपाचे बंडखोर नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी या फेरनियुक्तीवरून मोदींना कानपिचक्या दिल्यात.
'अजित डोवाल यांचं वय ७४ वर्षं आहे. त्यांना पाच वर्षांसाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार केलं गेलंय आणि कॅबिनेट मंत्र्याचा दर्जाही दिला गेलाय. बहुधा, खासदार आणि मंत्र्यांना जो नियम लागू आहे, तो कॅबिनेट रँकसाठी नसावा. बिचाऱ्या सुमित्रा महाजन', अशी ट्विप्पणी यशवंत सिन्हा यांनी केली आहे.
अजित डोवाल यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मोदींवर निशाणा साधण्याचाच प्रयत्न यशवंत सिन्हा यांनी केला आहे. ७५ वर्षं पूर्ण केलेल्या नेत्यांना तिकीट न देण्याचा एक अलिखित नियम भाजपामध्ये 'मोदी सरकार-1' दरम्यान झाला आहे. ७५+ नेत्यांना मंत्रिपद न देण्याची भूमिकाही मोदी-शहा जोडीनं घेतली होती. त्याच नियमाच्या आधारे लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन यांना सक्रिय राजकारणापासून दूर ठेवलं गेलं. त्यावरून पक्षातील एक वर्ग दुखावला गेला होता. यशवंत सिन्हा हे त्यापैकीच एक. अर्थात, लोकसभा निवडणुकीत मोदी त्सुनामी उसळल्यानंतर मोदींबद्दलची पक्षांतर्गत नाराजी कमी झाली आहे. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांचे आशीर्वाद घेऊन मोदींनी उलटसुलट चर्चांवर पडदा पाडला आहे. परंतु, सिन्हा यांनी ट्विटद्वारे पुन्हा वयाचा, ज्येष्ठतेचा आणि न्याय-अन्यायाचा मुद्दा उपस्थित केला आहे.