मजुरांच्या सुरक्षिततेसाठी यशवंत सिन्हांचे आंदोलन, दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यातनवी दिल्ली - भाजपाचे पूर्वाश्रमीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री यशवंत सिन्हा यांना अटक करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीतील राजघाट येथे स्थलांतरीत मजुरांसाठी त्यांनी आंदोलन सुरु केले होते. देशात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन असतानाही, सिन्हा यांनी आंदोलन उभारुन लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
माजी केंद्रीयमंत्री यशवंत सिन्हा यांच्यासह आम आदमी पक्षाच्या दोन नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. देशातील स्थलांतरी कामगार आणि मजूरांच्या मागणीसाठी त्यांनी धरणे आंदोलन सुरु केले होते. मजूरांच्या सुरक्षिततेसाठी सैन्य दलाला तैनात करण्याची मागणी सिन्हा यांनी केली होती. त्यामुळे दि्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी आम्हाला अटक केलीय, असे सिन्हा यांनी आपल्या ट्विटर अकांटवरुन सांगितले.
दरम्यान, यशवंत सिन्हा यांच्यासह आंदोलनकर्त्यांना केवळ ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला नाही, असे दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे. सध्या देशात लॉकडाऊन असल्याने शहरातून आपल्या गावी जाणाऱ्या मजूर वर्गाचे मोठे हाल होत आहेत. पायपीट करुन घर गाठण्याचा प्रयत्न करणाऱ्या मजुरांसोबत वाटेतच अपघातासारख्या दुर्दैवी घटना घडत आहेत. त्यामुळे, या मजुरांच्या सुरक्षिततेसाठी सिन्हा यांनी धरणे आंदोलन सुरु केले होते.