लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पुढील महिन्यामध्ये दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियममध्ये ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. तत्पूर्वी, दिल्लीतील मराठी भाषिकांना ‘शब्द’पुलाने जोडण्याचा प्रयत्न होणार आहे. संमेलन आयोजक संस्था ‘सरहद’तर्फे दिल्लीतील मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी ‘यशवंतराव चव्हाण निबंध लेखन स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेसाठी एक हजार ते बाराशे शब्दमर्यादा असून, स्पर्धेसाठी महाराष्ट्र दिल्ली ऐतिहासिक संबंध, भारतीय संविधानाची यशस्वी ७५ वर्षे, अभिजात मराठी, लोकशाहीच्या चष्म्यातून भारत, आरक्षण : साध्य की साधन हे पाच विषय ठेवण्यात आले आहेत. सहभागी स्पर्धकांमधून ३ विजेते निवडण्यात येणार असून, विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, प्रमाणपत्र सन्मानचिन्ह आणि पुस्तके देऊन गौरवण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास स्वेटशर्ट, पुस्तक, डायरी व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी ३१ जानेवारीपर्यंत, आयएएस दिल्ली इन्स्टिट्यूट, ५३/४, पहिला मजला, हॉटेल मडोणाजवळ ओल्ड राजेंद्र नगर, दिल्ली या पत्त्यावर आपले निबंध पाठवावेत, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.