नवी दिल्ली : माजी अर्थमंत्री व भाजपाचे नेते यशवंत सिन्हा यांनी अर्थव्यवस्था ढासळली असल्याची टीका करताच, काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांना बळ मिळाले असून, त्यांनीही मोदी सरकारला धारेवर धरले आहे. भाजपाच्या नेत्यांनी मात्र खासगीत बोलताना यशवंत सिन्हा हे नैराश्यातून विधाने करीत आहेत, त्यांना सत्तेत स्थान न मिळाल्याचा हा परिणाम आहे, अशी विधाने केली.माजी अर्थमंत्री व काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम म्हणाले की, या सरकारमुळे अच्छे दिन तर अजिबात आले नाहीत. त्यामुळे आता हे वाईट दिवस कधी जाणार, असे देशातील जनता विचारू लागली आहे. मोदी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची जी दशा करून ठेवली आहे, त्याविषयी अर्थतज्ज्ञांनी न घाबरता बोलायलाच हवे. आपण गेले १८ महिने आर्थिक स्थितीबाबत सातत्याने बोलत आहोत. पण सरकारने दखल घेतली नाही. आता सिन्हा यांच्याकडून सरकारला घरचा अहेरच मिळाला आहे.अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मात्र आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारने रोजगाराभिमुख प्रकल्पांवर मोठा खर्च करण्यात येणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की अर्थव्यवस्थेत प्राण ओतण्यासाठी ५00 अब्ज रुपयांचे पॅकेज देण्याची सरकारची तयारी असल्याचे त्यांनी मध्यंतरी सांगितले होते. त्याविषयी विचारता जेटली म्हणाले की, पंतप्रधानांशी चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात येईल. ?केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना सिन्हा यांच्या टीकेविषयी विचारता ते म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्था विकासाच्या दिशेनेच वाटचाल करीत आहे.सरकारच्या सल्लागारांमुळे ही अवस्थाकाँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही यशवंत सिन्हा यांचा हवाला देत मोदी सरकारवर टीका केली. दुसरीकडे भाजपा व रा. स्व. संघ यांच्याशी संबंधित असलेल्या भारतीय मजदूर संघानेही सध्याच्या आर्थिक स्थितीच्या निमित्ताने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.केंद्र सरकारने जे आर्थिक सल्लागार नेमले आहेत, त्यांच्यामुळेच ही अवस्था ओढावली आहे, कामगारांचे रोजगार जात आहेत, बेरोजगारांना रोजगार मिळणे थांबले आहे, असेही भारतीय मजदूर संघाने म्हटले आहे.
यशवंत सिन्हांमुळे विरोधकांना बळ; भारतीय मजदूर संघाचीही टीका, सरकारने दखल घ्यायला हवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 2:17 AM