श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील फुटीरवादी नेता यासिन मलिकला शुक्रवारी (23 फेब्रुवारी) अटक करण्यात आली आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने फुटीरतावाद्यांची सरकारी सुरक्षा काढून घेतल्यानंतर आता थेट कारवाईला सुरुवात केली आहे. यासिनच्या अटकेनंतर जम्मू-कश्मीर खोऱ्यात पाकिस्तानी समर्थक पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता असल्याने सुरक्षा दलाच्या जवानांना हायअलर्टचा इशारा देण्यात आला आहे.
जम्मू-कश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या संविधान कलम 35-Aवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यापार्श्वभूमीवर सुनावणीच्या आधी यासिनला अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 35-A कलमाअंतर्गत जम्मू-कश्मीरमध्ये इतर कोणत्याही राज्यातील वा राष्ट्रातील व्यक्तीला अचल संपत्ती खरेदी करण्यास मनाई आहे. संविधानाच्या याच कलमाला सर्वोच्च न्यायालयात आवाहन देण्यात आले आहे. न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जम्मू- काश्मीरमधील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
काश्मीरमधील फुटीरतावादी नेते पाकिस्तान सरकारशी संपर्कात असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारत सरकारनं त्यांच्या बाबतीत कठोर धोरण अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून राज्यातील पोलीस व निमलष्करी दलाला अतिदक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच सरकारनं काही फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढून घेतली होती. संरक्षण काढून घेण्यात आलेल्या नेत्यांमध्ये मीरवाइझ उमर फारुख, अब्दुल गनी बट्ट, बिलाल लोनस हाशमी कुरैशी आणि शब्बीर शाह यांचा समावेश आहे. या नेत्यांमध्ये यासिन मलिकचाही समावेश होता. या नेत्यांपैकी मीवराइझ उमर फारुख हा हुर्रियत कॉन्फ्ररन्स या फुटीरतावादी पक्षाचा चेअरमन आहे. या नेत्यांना देण्यात आलेले सरकारी संरक्षण काढतानाच त्यांना मिळणाऱ्या इतर सरकारी सुविधाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भारताने पाकसोबत युद्धाच्या प्रश्नाचे पाहावे; फुटीरतावाद्याच्या उलट्या बोंबा
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकाने काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. यावर अब्दुल गनी बट्ट याने आपल्याला सुरक्षेची गरजच नव्हती, त्यामुळे सुरक्षा काढून घेतल्याने काही फरक पडणार नाही, अशा उलट्या बोंबा मारायला सुरुवात केली आहे. तसेच भारत-पाकिस्तान युद्ध होण्याची शक्यताही त्याने काही दिवसांपूर्वी व्यक्त केली आहे. अब्दुल गनी बट्ट याने एएनआयला दिलेल्या माहितीमध्ये त्याने आपल्याला सुरक्षा राज्य सरकारने पुरविली होती. आपल्याला या सुरक्षेची गरज नव्हती. काश्मीरी जनताच आपली सुरक्षा आहे. आधी पाकिस्तान आणि भारताने त्यांचा युद्धाचा प्रश्न सोडवावा, अशी फुशारकी मारली आहे.