नवी दिल्ली- गेल्या वर्षी सिक्कीममधल्या डोकलाममध्ये चीननं केलेल्या घुसखोरीवरून दोन महिन्यांहून अधिक काळ भारत-चीनदरम्यान संघर्ष सुरू होता. काही काळानंतर तो निवळला. परंतु चीनच्या कुरापती काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. चीननं आता डोकलाम नव्हे, तर लडाखमध्ये घुसखोरी केली आहे.4,057 किलोमीटर लांब असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषे(एलओसी)वरच्या वेगवेगळ्या भागात चीनकडून घुसखोरी सुरूच आहे. गेल्या महिन्यातही लडाखमधल्या डेमचोक सेक्टरमध्ये भारताच्या हद्दीत 300 ते 400 मीटरपर्यंत चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैन्यानं घुसखोरी करत 5 टेंट उभारले होते. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये झालेल्या चर्चेअंती चीननं सैन्य माघारी बोलावलं होतं. परंतु तरीही चेरडाँग-नेरलाँग नाल्लान भागात 5 पैकी 2 टेंट कायम आहेत. त्यात अद्यापही चिनी सैनिक उपस्थित आहेत.भारतीय लष्करानं त्यांची विचारपूस केली असता, त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला. पीएलएच्या सैनिकांनी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गुरख्यांच्या रूपात भारतीय हद्दीत घुसखोरी केली आहे. भारतीय लष्करानं वारंवार सांगूनही ते माघारी गेलेले नाहीत. अशा परिस्थितीत 'बॅनर ड्रिल'चा उपयोग केला जातो. ज्यात लष्कर दुस-या पक्षकाराला झेंडा दाखवून स्वतःच्या क्षेत्रात परत जाण्याचे संकेत देतो. बॅनर ड्रिलनंतर चिनी सैनिक स्वतःच्या भागात परतलेलं नाही. भारतात ब्रिगेडिअर स्तरावर चर्चा झाल्यानंतर चीननं तीन तंबू हटवले होते. परंतु दोन अद्यापही तसेच आहेत.
डोकलामनंतर आता लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरूच..
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 9:16 AM