लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारताच्या सकळ देशांतर्गत उत्पन्नाच्या वाढीचा दर २०१७-१८ मध्ये ७.४ टक्के राहील, असे औद्योगिक संघटना फिक्कीने म्हटले आहे.फिक्कीने मार्च आणि एप्रिल २०१७ या दोन महिन्यांच्या काळात इकॉनॉमिक आऊटलूक सर्व्हे केला. त्याचा तपशील जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, २०१७-१८ या वर्षात भारताचा वृद्धीदर ७.४ टक्के राहील. किमान ७.० टक्के आणि कमाल ७.६ टक्के या दरम्यान वृद्धीदर राहील.फिक्कीने म्हटले की, औद्योगिक आणि सेवा क्षेत्रातील सुधारणा वृद्धीदर वाढीस पोषक आहे. २०१७-१८ या वर्षात औद्योगिक क्षेत्र ६.९ टक्क्यांनी, तर सेवा क्षेत्र ८.४ टक्क्यांनी वाढेल.एप्रिलमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताचा वृद्धीदर ७.२ टक्के राहील, असे म्हटले होते. तथापि, नोटाबंदीचा संपूर्ण परिणाम अजून काही समोर आलेला नाही, तो कळायला वेळ लागेल, असेही नाणेनिधीने म्हटले होते. नोटाबंदीचा फारसा परिणाम वृद्धीदरावर होणार नसल्याचा अंदाज केंद्रीय सांख्यिकी संस्थेने (सीएसओ) या आधीच व्यक्त केला आहे. भारताचा वृद्धीदर ७.० टक्के राहील, असे सीएसओने म्हटले आहे.फिक्कीने म्हटले की, कृषी क्षेत्रातील ताज्या आकडेवारीनुसार, २०१६-१७ मध्ये डाळींचे विक्रमी उत्पादन झाले आहे. भारताचे स्थूल आर्थिक आधार मजबूत आहेत. नोटाबंदीचा अचानक बसलेला झटका सहन करण्यास अर्थव्यवस्था पुरेशी मजबूत आहे. नोटाबंदी झाल्या झाल्या अर्थव्यवस्थेवर काही परिणाम दिसून येत होता. तथापि, नव्या नोटा अर्थव्यवस्थेत टाकण्याची प्रक्रिया जसजशी पूर्णत्वास येत गेली, तसतसा हा परिणामही कमी होत गेला. आता अर्थव्यवस्था सुधारत आहे. कृषी क्षेत्राने चांगली झेप घेतली आहे. व्यावसायिकांचा आत्मविश्वासही वाढला आहे.
यावर्षी भारताचा वृद्धीदर पोहोचणार ७.४ टक्क्यांवर
By admin | Published: May 16, 2017 1:59 AM