प्रमोद गवळी, नवी दिल्लीपंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत २०२० पर्यंत एकूण ९९ सिंचन प्रकल्पांचे काम पूर्ण करण्यात येईल. हे प्रकल्प त्वरित सिंचन लाभ कार्यक्रमांतर्गत (एआयबीपी) पूर्ण करण्यात येत आहेत. त्यात महाराष्ट्रातील २६ प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यांचा अंदाजित खर्च ३६२९८ कोटी रुपये आहे. या २६ पैकी ७ प्रकल्प चालू वर्षातच पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती जल संसाधन राज्यमंत्री प्रा. सांवरलाल जाट यांनी बुधवारी राज्यसभेत दिली. काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. प्रा. जाट म्हणाले, यावर्षी महाराष्ट्रातील वाघूर (खर्च १२३३ कोटी रुपये), बावनथडी (आयएस) (७३९ कोटी), लोअर दुधना (१५५२ कोटी), तिल्लारी (६५६ कोटी), लोअर वर्धा (१९१२ कोटी), लोअर पंजारा (२९५ कोटी) आणि नांदूर मधमेश्वर, दुसरा टप्पा (२०.५० कोटी) हे सात सिंचन प्रकल्प पूर्ण केले जातील. या प्रकल्पांना प्राधान्यक्रम देण्यात आला आहे.याशिवाय २०२० पर्यंत ज्या सिंचन प्रकल्पांचे काम पूर्ण केले जाणार आहे, त्यात गोसेखुर्द (एनपी) (खर्च १३३६६ कोटीे), अप्पर पैनगंगा (१५१२ कोटी), बेंबळा (३०५७ कोटी), तराळी (८१६ कोटी), धोम बालकवाडी (७५१ कोटी), अर्जुना (६४२ कोटी रुपये), अप्पर कुंडलिका (२७४ कोटी), अरुणा (५८८ कोटी), कृष्णा कोयना लिफ्ट (२३२८ कोटी), गडनदी (३७.५५ कोटी), सांगोला शाखा कालवा (८०६ कोटी), खडकपूर्णा १३४८ कोटी), वारणा (१०६३ कोटी), मोरना (गुरेघर) (१८३ कोटी), लोअर पेंदी (१०७१ कोटी), वांग प्रकल्प (१९४ कोटी), नरदेव (मोहम्मदवाडी) (२५३ कोटी) आणि कडिली (३२४ कोटी) यांचा समावेश आहे, असे प्रा. जाट यांनी सांगितले.
यंदा पूर्ण होतील सात सिंचन प्रकल्प
By admin | Published: May 12, 2016 3:56 AM