- नितीन अग्रवाल ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला लोकसभा निवडणुकांत बहुमत मिळेल, असे निष्कर्ष एक्झिट पोलमधून आले असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांचे हस्तांदोलन करून आभार मानले. भाजपच्या मुख्यालयात झालेल्या या समारंभाला रालोआतील घटक पक्षांचे सर्व नेतेही उपस्थित होते. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी हा आभार प्रदर्शन सोहळा आयोजित केला होता.
शिवसेनेचे उद्धव ठाकरे, सुभाष देसाई, आदित्य ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, अकाली दलाचे नेते प्रकाशसिंग बादल, तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी, उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम, अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर, लोक जनशक्ती पार्टीचे राम विलास पासवान, रिपब्लिकन पार्टीचे नेते रामदास आठवले, अपना दलाच्या अनुप्रिया पटेल, तसेच भाजपचे अरुण जेटली, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, जे. पी. नड्डा आदी सारेच मंत्री व बडे नेते या समारंभाला उपस्थित होते. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी नंतर भोजन समारंभही ठेवला होता. त्याआधी पंतप्रधान मोदी यांनी केवळ भाजपच्या नव्हे, तर मित्रपक्षांच्या मंत्र्यांचेही नाव घेऊन आभार मानले. तसेच गेली पाच वर्षे साथ देणाऱ्या वरील सर्व पक्षांविषयीही कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. यावेळी रालोआतील ३६ घटक पक्षांचे नेते उपस्थित होते. आणखी तीन पक्षांनी लेखी समर्थन कळवले आहे. यावेळी सर्व पक्षांनी केंद्रात पुन्हा रालोआचे मजबूत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास दाखविला.
या समारंभानंतरच्या भोजनालाही हे सारे नेते हजर होते. त्याआधी सरकारच्या पाच वर्षांतील कार्याचा पंतप्रधानांनी आढावा घेतला. आपण अनेक निवडणुका पाहिल्या. पण मला या निवडणुकांत कुठेच राजकारण दिसले नाही. लोकांनी स्वत:हून आपल्याला मते देण्याचे ठरविले होते व तेच आपला प्रचार करीत होते. त्यामुळे ही निवडणूक म्हणजे माझ्यासाठी जणू तीर्थयात्राच होती, असा दावा मोदी यांनी केला. या समारंभावेळी नितीश कुमार यांनी बिहारला विशेष दर्जा व अधिक निधी देण्याची विनंती पंतप्रधानांना केल्याचे समजते.