बेळगाव- 'आता आरामात बसू नका, जर तुम्हाला वाटलं की कोणी मतदान करत नाही तर त्याच्या घरी जाऊन त्याचे हात-पाय बांधून त्याला मतदान केंद्रावर घेऊन या आणि भाजपाचे उमेदवार महांतेश दोद्दागोडर यांना मत देण्यास भाग पाडा, असं वादग्रस्त विधान कर्नाटकात भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा यांनी केलं आहे. महांतेश हे कर्नाटकातील कित्तूर येथील उमेदवार आहेत. येडियुरप्पांनी केलेल्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत.
12 मे रोजी कर्नाटकात मतदान होत आहे. तर 15 मे रोजी निकाल येणार आहे. कर्नाटक विधानसभेसाठी काँग्रेस व भाजपामध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळते आहे. सध्या कर्नाटकात काँग्रेसचं राज्य आहे. पण कर्नाटक काँग्रेसकडून घेऊन सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तर सत्ता कायम ठेवण्यासाठी काँग्रेसकडूनही प्रयत्न केले जात आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (ता. 5 मे) कर्नाटकात विविध ठिकाणी लोकांना संबोधीत केलं. यावेळी मोदींनी काँग्रेसवर सडकून टीका केली. कर्नाटक निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस पीपीपी बनून जाईल, म्हणजेच पंजाब, पुद्दूचेरी आणि परिवार (काँग्रेस) असा याचा अर्थ आहे, अशी टीका मोदींनी गादगमध्ये झालेल्या सभेत केली.