बंगळुरू : भाजपचे नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी शुक्रवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी राजभवनात झालेल्या छोटेखानी समारंभात त्यांना शपथ दिली. येडियुरप्पा यांना सोमवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. आपण सहज बहुमत सिद्ध करू, असा दावा त्यांनी केला.
एकट्या येडियुरप्पा यांचाच शपथविधी आज पार पडला. विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतरच अन्य मंत्र्यांना शपथ देण्यात येईल. पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा करून मगच मंत्रिमंडळ ठरवू, असे येडियुरप्पा यांनी स्पष्ट केले.
येडियुरप्पा यांनी १0५ आमदारांचा पाठिंबा असल्याचे राज्यपालांना शुक्रवारी सकाळी सत्तास्थापनेचा दावा करताना सांगितले. मात्र ही संख्या बहुमतासाठी पुरेशी नाही. त्यामुळे विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी किती आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे, हे स्पष्ट होईल. काही आमदारांनी याआधी विधानसभाध्यक्षांना राजीनामे दिले आहेत. त्यांच्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. तसेच तीन आमदारांना विधानसभाध्यक्ष रमेश कुमार यांनी गुरुवारीच अपात्र ठरविले आहे. त्यामुळे सोमवारी किती जण मतदान करतात व किती जणांना मतदानाचा अधिकार असेल, हे २ दिवसांत स्पष्ट होईल.
बहुमत नसताना शपथविधी का?भाजपकडे १0५ आमदारच आहेत. बहुमतासाठी ही संख्या पुरेशी नाही, हे माहीत असताना येडियुरप्पा यांना राज्यपालांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ दिलीच कशी, असा सवाल काँग्रेसचे विधानसभेतील नेते व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला.
स्थिर सरकार देईन
मी सोमवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करेन आणि कर्नाटकला स्थिर सरकार देण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी होईल. पक्षाध्यक्षांशी बोलून मी मंत्रिमंडळाचा विस्तार करेन. - येडियुरप्पा