भाजपाने कर्नाटकमध्ये नवीन प्रदेशाध्यक्षाची घोषणा केली आहे. हा नवीन प्रदेशाध्यक्ष दुसरे तिसरे कोणी नसून येडीयुराप्पांचा मुलगाच आहे. सलग दुसऱ्या दारुण पराभवानंतर भाजपाला पुन्हा एकदा येडीयुराप्पांचाच आधार घ्यावा लागत आहे.
कर्नाटक निवडणूक होऊन सहा महिने झाले तरी भाजपा अद्याप विधानसभेत विरोधी पक्षाच्या नेत्याची निवड करू शकलेली नाहीय. यातच अनिल कुमार कतील यांच्याजागी बीवाय विजयेंद्र यांना नियुक्त केल्याने नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत. विजयेंद्र यांना येडीयुराप्पांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात विरोध झाला होता. ते राजकारणात ढवळाढवळ करत असल्याचे, इतर मंत्र्यांच्या कारभारात लुडबुड करत असल्याचे आरोप झाले होते. यामुळे त्यांना भाजपाने काही काळ लांब ठेवले होते. तसेच वयाचे कारण दाखवून येडीयुराप्पांना देखील सक्रीय राजकारणातून बाजुला केले होते. परंतू, पुन्हा भाजपाला येडीयुराप्पांचीच मदत घेणे भाग पडले आहे.
बीएस येडीयुरप्पा यांनी २०२१ मध्ये मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. आता हा राजीनामा का झाला, कसा झाला, कोणत्या परिस्थितीत? हा वादाचा विषय होऊ शकतो. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली 2008 च्या निवडणुकीत भाजप प्रथमच कर्नाटकात सत्तेवर आला आणि त्यानंतरही त्यांना मुख्यमंत्रीपद मध्यावधीतच सोडावे लागले. खाणकामातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणात येडीयुरप्पा यांचे नाव पुढे आले आणि नेतृत्वाच्या दबावाखाली त्यांना पायउतार व्हावे लागल्याचे बोलले जाते. यामुळे त्यांनी पक्षही सोडला होता. तसेच दुसरा पक्ष काढून ते लढले होते. परंतू, त्यांना यश आले नाही व ते पुन्हा भाजपात दाखल झाले.
जेडीएस-काँग्रेस युतीचे सरकार पडल्यानंतर, भाजपने येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले परंतु त्यांना 2021 मध्ये पदाचा राजीनामा द्यावा लागला. आता पुन्हा भाजपाला त्यांच्याशिवाय कोणताही तरणोपाय नाही असे दिसत आहे.