बंगळुरू - भाजपाचे कर्नाटकमधील प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनीकाँग्रेसचे दिग्गज नेते आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेतली. या भेटीवेळी येडियुरप्पांसमवेत त्यांचे पुत्र आणि शिवमोगा येथील खासदार बी. वाय. राघवेंद्र हे सुद्धा उपस्थित होते. या भेटीमुळे कर्नाटकमधील राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. डी.के. शिवकुमार यांच्या निवासस्थानी येडियुरप्पा आणि शिवकुमार यांच्यात सुमारे तासभर ही चर्चा झाली. तसेच येडियुरप्पा आणि शिवकुमार यांच्यात 20 मिनिटे बंद दाराआड चर्चा झाल्याचे वृत्त आहे. मात्र दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या शिमोगा येथील सिंचन प्रकल्पांबाबत चर्चा करण्यासाठी ही भेट झाल्याचे औपचारिकपणे सांगण्यात येत आहे. मात्र येडियुरप्पा यांनी एक राजकीय आघाडी तयार करण्यासाठी शिवकुमार यांना ऑफर दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र एकेकाळचे मित्र असलेल्या आणि आता प्रतिस्पर्धी बनलेल्या शिवकुमार आणि येडियुरप्पा यांनी ही अफवा फेटाळून लावली आहे. येडियुरप्पा म्हणाले की, माझ्या मतदारसंघातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी मी शिवकुमार यांची भेट घेतली. मी त्यांची भेट घेतली. यावेळी शिकारीपुरा, शिमोगा ग्रामीण आणि सोराबा विधानसभा मतदारसंघातील दीर्घकापासून प्रलंबित असलेल्या सिंचन योजना सुरू करण्यासाठी मी शिवकुमार यांना विनंती केली." या बैठकीत येडियुरप्पांचे पुत्र राघवेंद्र यांनी सिंचन योजनांसाठी 2 हजार कोटी रुपयांची मागणी केली. त्याला शिवकुमार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी वन विभाग, जल संसाधन मंत्रालय आणि पीडब्ल्यूडीचे अधिकारीही उपस्थित होते. येडियुरप्पा गेल्या दोन महिन्यांपासून मला भेटू इच्छित होते. मात्र व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांना भेटणे शक्य होत नव्हते, असे शिवकुमार यांनी सांगितले. मात्र कर्नाटकमधील या दोन नेत्यांच्या भेटीवेळी शिमोगा ग्रामीण मतदारसंघातील भाजपा आमदार के. बी. अशोक नायर आणि सोराबा येथील भाजपा आणदार कुमार बंगारप्पा यांची अनुपस्थिती असल्याने तर्कवितर्क वर्तवण्यात येत आहेत.
येडियुरप्पांनी घेतली काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांची भेट, तर्कवितर्कांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 4:09 PM
भाजपाचे कर्नाटकमधील प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेतली.
ठळक मुद्देभाजपाचे कर्नाटकमधील प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेतली भेटीवेळी येडियुरप्पांसमवेत त्यांचे पुत्र आणि शिवमोगा येथील खासदार बी. वाय. राघवेंद्र हे सुद्धा उपस्थित दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या शिमोगा येथील सिंचन प्रकल्पांबाबत चर्चा करण्यासाठी ही भेट झाल्याचे औपचारिकपणे सांगण्यात येत आहे