Karnataka Elections 2018 : येडियुरप्पा मानसिक दृष्टया अस्थिर- सिद्धरामय्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2018 03:25 PM2018-05-12T15:25:59+5:302018-05-12T15:25:59+5:30
२२४ पैकी १५० जागा काँग्रेस जिंकेल असा दावा त्यांनी केला आहे.
नवी दिल्ली- कर्नाटक विधानसभेसाठी आज (ता. 12 मे) मतदान होत आहे. निवडणुकीसाठी भाजपा व काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोन्ही पक्षांनी प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या. दरम्यान आज मतदानाच्या दिवशीही कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपा नेते बी.एस.येडियुरप्पा यांच्यावर निशाणा साधला आहे. 'येडियुरप्पा मानसिक दृष्टया अस्थिर आहेत. २२४ पैकी १५० जागा काँग्रेस जिंकेल असा दावा त्यांनी केला आहे.
सिद्धरामय्या म्हणाले की,' येडियुरप्पा मानसिक दृष्ट्या अस्थिर झाले आहेत. कर्नाटकात भाजपाला 120 जागा मिळतील. प्रत्येक समूदायातील गरीब जनता काँग्रेसच्या पाठीशी आहे. काँग्रेस पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल. यात कुठलीही शंका नाही, असं सिद्धरामय्या यांनी म्हटलं.
दरम्यान, कर्नाटकासाठी भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा यांनी याआधी कर्नाटक विधानसभेवर सत्ता स्थापनेचा दावा केला होता. भाजपाला 145-150 जागा मिळतील, असं ते म्हणाले होते. 15 मे रोजी संध्याकाळी मी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला जाणार असून 17 मे रोजी होणाऱ्या शपथविधीसाठी त्यांना निमंत्रण देईन, असं वक्तव्य येडियुरप्पा यांनी माध्यमांशी बोलताना केलं होतं.
दरम्यान, कर्नाटक विधानसभेच्या 222 जागांसाठी मतदान सुरु आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत 56 टक्के मतदान झालं आहे. कर्नाटक विधानसभेसाठी काँग्रेस-भाजपाने जोरदार प्रचार केला आहे. त्यामुळे कर्नाटक विधानसभा नेमकी कोणाकडे जाणार याबद्दलची उत्सुकता निर्माण झाली आहे.