बंगळुरू : कर्नाटकचे चौथ्यांदा मुख्यमंत्री झालेले भाजपचे नेते बी. एस. येडीयुरप्पा यांनी शपथविधीनंतर तब्बल पंचवीस दिवसांनी बनविलेल्या १७ जणांच्या मंत्रिमंडळाबद्दल भाजपमधील असंतुष्टांची नाराजी प्रकट होऊ लागली आहे. मंत्रिमंडळात समावेश केलेल्यांची यादी पाहून वेदना झाल्याचे तसेच आश्चर्यही वाटल्याचे चित्रदुर्ग येथील भाजप आमदार जी. एच. थिप्पा रेड्डी यांनी म्हटले आहे. ते मंत्रीपदासाठी इच्छुक होते.असंतुष्टांना सामावून घेता यावे यासाठी येडीयुरप्पा यांनी मंत्रिमंडळामधील १६ खात्यांसाठी अद्याप मंत्र्यांची निवड केलेली नाही. जनता दल व काँग्रेसच्या १७ बंडखोर आमदारांनी घेतलेल्या पवित्र्यामुळेच कुमारस्वामी सरकार अल्पमतात गेले. विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकता न आल्याने हे सरकार जाऊन येडीयुरप्पा यांनी सरकार स्थापन केले. १७ बंडखोर आमदारांना कर्नाटक विधानसभेच्या याआधीच्या अध्यक्षांनी अपात्र ठरविले असून, त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.न्यायालयाचा निकाल येईपर्यंत या बंडखोर आमदारांना मंत्रिमंडळात समाविष्ट करता येणार नाही हे भाजपने येडीयुरप्पांच्या शपथविधीच्या वेळीच स्पष्ट केले होते. मंत्रीपदाची आस असलेले भाजपमधील आमदारही गप्प बसायला तयार नाहीत. त्या पक्षाचे आमदार जी. एच. थिप्पा रेड्डी यांनी म्हटले आहे की, भाजपमधील निष्ठावान व ज्येष्ठ आमदारांना मंत्रीपदापासून डावलण्यात आले आहे हे पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनास आणून दिले जाईल. त्यासाठी पक्षातील समविचारी आमदार लवकरच एक बैठकही घेणार आहेत. (वृत्तसंस्था)असंतुष्टांच्या समर्थकांचे रास्ता रोकोजी. एच. थिप्पा रेड्डी यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्याच्या निषेधार्थ त्यांच्या समर्थकांनी चित्रदुर्ग येथील गांधी चौकात रास्ता रोको आंदोलनही केले. सुलिया मतदारसंघातील भाजपचे आमदार एस. अंगारा हे आजवर सहा वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. आपल्याला मंत्रीपद न दिल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अंगारा म्हणाले की, मूल्ये पाळून सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्यांना डावलणे हे माझ्या मतदारसंघातील लोकांनाही आवडलेले नाही.आठ वेळा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आलेले उमेश कट्टी, माजी केंद्रीय मंत्री बसवराज पाटील हे येडीयुरप्पा यांच्या नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीला अनुपस्थित असणे हेही पुरेसे बोलके होते. कर्नाटकच्या किनारपट्टी भाग तसेच इतर भागांनाही मंत्रिमंडळात पुरेसे प्रतिनिधित्व मिळाले नसल्याची तक्रार भाजपच्या आमदारांनी केली आहे.
येडीयुरप्पा यांच्या मंत्रिमंडळावरून कर्नाटक भाजपमध्ये प्रचंड नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 4:18 AM