बंगळुरू: कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा राजीनामा देणार आहेत. दुपारी जेवणानंतर राज्यपालांना भेटून त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करणार असल्याची माहिती येडियुरप्पांनी दिली. कर्नाटकमधील येडियुरप्पा सरकारला २ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनामा देणार असल्याची माहिती दिली. गेल्या अनेक दिवसांपासून येडियुरप्पा यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू होती. आपण राजीनामा देणार नसल्याचं येडियुरप्पांनी म्हटलं होतं. त्यानंतर दिल्लीत बैठकांचं सत्र सुरू होतं. अखेर येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्रिपदी कायम राहणार की नाही, याचा निर्णय सोमवारी होईल असं येडियुरप्पा यांनी दोनच दिवसांपूर्वी म्हटलं होतं. आपण पुढील १० ते १५ वर्षे भाजपसाठी काम करू असंदेखील त्यांनी सांगितलं होतं. ७८ वर्षांचे येडियुरप्पा लिंगायत समाजातील मोठे नेते आहेत. गेल्या २ दशकांपासून ते कर्नाटक भाजपचा चेहरा राहिले आहेत. मुख्यमंत्रिपदी कायम राहायचं की नाही याबद्दल नेतृत्त्वानं कोणताही संदेश दिला नसल्याचं येडियुरप्पांनी काल संध्याकाळी म्हटलं होतं.
विशेष म्हणजे येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा करण्यापूर्वी भाजपचे सचिव सी. टी. रवी यांनी त्यांचं अभिनंदन केलं होतं. 'मुख्यमंत्रिपदी २ वर्ष पूर्ण केल्याबद्दल येडियुरप्पांचं अभिनंदन. ते कर्नाटक आणि भाजपला मार्गदर्शन करत राहतील,' असं रवी यांनी म्हटलं होतं. यानंतर पुढच्या काही मिनिटांत येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली. येडियुरप्पांनी पायउतार होण्याआधी पक्षासमोर ३ अटी ठेवल्याचं बोललं जातं. एका मुलाला केंद्रात, तर दुसऱ्याला राज्यात मंत्रिपद आणि पुढील मुख्यमंत्री आपल्याच मर्जीतील अशा तीन अटी येडियुरप्पांनी नेतृत्त्वासमोर ठेवल्या होत्या अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.