नवी दिल्ली : सरकारने युद्धग्रस्त येमेनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही तासांतच एअर इंडियाने आखाती देशातील शेकडो भारतीयांना परत आणण्यासाठी आपले पहिले विमान रवाना केले.१८० आसनी एअर बस ए ३२० ने सोमवारी सकाळी ७.४५ वाजता दिल्लीहून येमेनची राजधानी सानाकडे उड्डाण केले. हे विमान उद्या सकाळी येमेनहून दिल्लीत परतण्याची शक्यता आहे. साना ते दिल्लीपर्यंत उड्डाण करण्याची परवानगी मिळाली आहे, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी काल सांगितले होते. येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी १५०० प्रवासी क्षमता असलेले जहाज पाठविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्या म्हणाल्या होत्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)