नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्जाचा एनपीए वाढल्याने येस बँकेवर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी भाजपावर निशाणा साधला आहे.
ज्यावेळी अर्थमंत्र्यांचे (निर्मला सीतारामन) भाषण ऐकतो, त्यावेळी असे वाटते की, आताही यूपीए सत्तेत आहे आणि मी अर्थमंत्री आहे, असे पी. चिदंबरम म्हणाले. तसेच, त्यांनी 2014 ते 2019 या दरम्यान येस बँकेद्वारे देण्यात आलेल्या कर्जासंबंधी विस्तृत माहिती दिली. शिवाय, 2014 नंतर कोणी येस बँकेला कर्ज वाटप करण्याची परवानगी दिली, असा सवालही केला.
चिदंबरम म्हणाले, "येस बँकेचे लोन बुक 2014 ते 2019 च्यादरम्यान पाच पटीने वाढले. 2014 मार्चमध्ये लोन बुक रक्कम 55 हजार कोटी रुपये होती, त्यामध्ये मार्च 2019 मध्ये वाढ होऊन 2 लाख कोटीहून अधिक झाली. फक्त दोन वर्षांत 98 हजार कोटींची वाढ होऊन 2 लाख कोटींपेक्षा जास्त झाली.
याचबरोबर, पी. चिदंबरम यांनी येस बँकेला वाचवण्यासाठी स्टेट बँकेच्या सध्याच्या योजनेवरूनही सवाल उपस्थित केला. स्टेट बँक 2450 कोटी रुपयांत 49 टक्के शेअर खरेदी करेल. या योजनेऐवजी येस बँकेच्या टेकओव्हरबाबात भाष्य करत स्टेट बँक बॅड लोन बुक वाढवेल, असेही पी. चिदंबरम म्हणाले.
पी. चिदंबरम म्हणाले, "ज्या बँकेचे नेटवर्थ शून्य आहे, त्या बँकेचे 49 टक्के शेअर स्टेट बँक खरेदी करत आहे. त्याऐवजी स्टेट बँकेने येस बँकेचे टेकओव्हर करावे आणि ठेवीदारांना सांगावे की, त्यांचा प्रत्ये पैसा सुरक्षित आहे. तसेच, बॅड लोनची वसुली सुरू करावी."