नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात 5 मार्चला रिझर्व्ह बँकेने कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या Yes Bank वर महिनाभराचे निर्बंध लादले होते. या काळात खातेधारक अटींवर केवळ 50 हजार रुपयेच काढू शकत होते. यामुळे सलग दोन दिवस शेअर बाजार कमालीचा कोसळला होता. एसबीआयनेयेस बँकेमध्ये रुची दाखविल्याने अखेर बँकेवरील निर्बंध उठविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
येस बँकेच्या पुनरुज्जीवन योजनेची घोषणा काल रात्री उशिराने करण्यात आली. केंद्रीय अर्थ मंत्रालय़ाने येस बँक पुनरुज्जीवन योजना 2020 ची अधिसूचना जारी केली. यामध्ये या अधिसूचनेच्या तीन दिवसांनंतर बँकेवरील निर्बंध उठविण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. तसेच बँकेच्या नव्या संचालक मंडळावर स्टेट बँक ऑफ इंडियाचे दोन संचालक अधिसुचनेच्या सात दिवसांच्या आत घ्यावे लागणार असल्याचे म्हटले आहे.
Yes Bank वरील निर्बंधांमुळे देशात खळबळ उडाली होती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ग्राहकांचे पैसे सुरक्षित असल्याचे म्हटले होते. यानंतर एसबीआयला येस बँकेत गुंतवणूक करण्यास सांगितले होते. यानुसार येस बँकेच्या पुनर्उभारणीचा आराखडा तयार करण्यात आला असून संस्थापक संचालक राणा कपूरलाही ईडीने ताब्यात घेतले आहे. बॅकेची आर्थिक स्थिती बिघडल्यामुळे आरबीआयने केंद्र सरकारशी सल्लामसलत करून येस बँकेच्या संचालक मंडळाला 30 दिवसांसाठी निलंबित केले होते. एसबीआयचे माजी मुख्य आर्थिक अधिकारी प्रशांत कुमार यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती.
Yes Bank च्या राणा कपूरला आरबीआयने असे ब्रिटनमधून 'उचलले'Yes Bank : अंबानींच्या बाजूलाच राणा कपूरचा राजवाडा; देशातील 10 महागड्या घरांमध्ये समावेश
गेल्या 8 महिन्य़ांमध्ये जवळपास तीन वेळा येस बँकमध्ये गुंतवणुकीचा व्यवहार जवळपास फायनल होत आला होता. मात्र, तेव्हाच शेवटच्या क्षणी संभाव्य़ गुंतवणूकदारांनी माघार घेतली. काही काळ सरकार आणि आरबीआयला ही समजले नाही की नेमके काय चालले आहे. नंतर येस बँकेचा पुन्हा ताबा घेण्यासाठी उत्सूक आहेत, असा संदेश राणा कपूर यांनी रिझर्व्ह बँकेपर्यंत पोहचविला. यामुळे येस बँकेची अवस्था सुधरविण्याचा प्लॅन राणाच अपयशी करत असल्याचा संशय सरकार आणि आरबीआयला आला. तेथूनच राणाला त्याच्याच जाळ्यात ओढण्यासाठी खेळी खेळली गेली. याबाबतचे वृत्त एनबीटीने दिले आहे.