नवी दिल्ली - लडाखमधील चीनच्या घुसखोरीवरून काँग्रेस आणि भाजपामध्ये सुरू असलेले आरोपप्रत्यारोपांचे सत्र अधिकच तीव्र झाले आहे. भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलेले आरोप खोडून काढत उलट त्यांच्यावरच प्रत्यारोप केल्यानंतर आता ड़ॉ. सिंग यांच्या बचावासाठी काँग्रेसच्या कार्यकाळात गृहमंत्री असलेले पी. चिदंबरम पुढे आले आहेत. पी. चिदंबरम यांनी ट्वविटरवरून मोर्चा सांभाळत नड्डांवर निशाणा साधला आहे.
या ट्विटमध्ये चिदंबरम म्हणतात, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे २०१० ते २०१३ या काळात भारतामध्येचीनकडून ६०० वेळा झालेल्या घुसखोरीचे स्पष्टीकरण मागितले आहे. हो तेव्हा चीनकडून घुसखोरी झाली होती. मात्र त्यावेळी चीनने कुठल्याही भारतीय भूभागावर कब्जा केला नव्हता. तसेच हिंसक झटापटीत भारतीय जवानांचा मृत्यू झाला नव्हता, असा टोली चिदंबरम यांनी लगावला.
लडाखमधील गलवान खोऱ्यात गेल्या सोमवारी चिनी सैनिक आणि भारताच्या जवानांमध्ये हिंसक झटापट झाली होती. त्यामध्ये एका कर्नलसह २० भारतीय जवानांना वीरमरण आले होते. तर चीनचे सुमारे ४५ सैनिक मृत्युमुखी पडले होते. चिनी सैनिकांनी भारतीय सीमेच्या बाजूने लावलेले तंबू हटवण्यासाठी भारतीय जवान गेले असताना ही झटापट झाली होती. दरम्यान, ६ जून रोजी लेफ्टनेंट जनरल रँकच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर हे तंबू हटवण्याची हमी चीनने दिली होती. मात्र नंतर चीनने दगाबाजी करत येथील तंबू कायम ठेवले होते.
दरम्यान, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर काल भारत आणि चीनमध्ये लेफ्टनंट जनरल स्तरावरील बैठक झाली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलीकडे चीनच्या हद्दीत येणाऱ्या मोल्डो भागात ही बैठक पार पडली. तब्बल १२ तास चाललेल्या बैठकीत काही महत्वाच्या मुद्द्यांवर एकमत झाल्याची माहिती भारतीय लष्करानं दिली आहे. सीमेवरून सैन्य मागे घेण्यास चीन तयार आहे. त्यामुळे भारतही आपले जवान मागे घेईल, असं लष्कराकडून सांगण्यात आलं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या