ऑनलाइन लोकमत
कोझीकोडे, दि. १७ - लोक मला उद्या दहशतवादी म्हणून बोलवतील, अल्लाहच्या मार्गावर लढणे दहशतवाद असेल तर हो, मी दहशतवादी आहे असा संदेश केरळमधून बेपत्ता असलेल्या युवकाने त्याच्या कुटुंबाला पाठवला आहे. केरळमधून जे १५ युवक इसिसमध्ये सहभागी झाल्याचा संशय आहे. त्यापैकी एक मोहम्मद मारवानने हा संदेश पाठवला आहे.
जूनच्या शेवटच्या आठवडयात टेलिग्राम अॅपवरुन त्याने कुटुंबाला हा संदेश पाठवला आहे. पश्चिम आशियातील दहशतवादी संघटनेच्या नियंत्रणाखाली असलेल्या भूप्रदेशातून आपण हा संदेश पाठवत असल्याचे मोहम्मदने म्हटले आहे. इसिस बरोबरचे काम संपवून मी परत येईन. त्यानंतर मला काश्मीर, गुजरात आणि मुझफ्फरनगरमधल्या पिडित मुस्लिमांना मदत करायची आहे.
अमेरिका, रशियाच्या बॉम्ब हल्ल्यात अनेक निष्पाप मुस्लिमांचा मृत्यू होत आहे. मुस्लिम समाज अडचणीत असताना मी शांतपणे घरी कसा काय बसू शकतो ?. मुस्लिमांवर अन्याय, अत्याचार सुरु होता त्यावेळी मी काय करत होतो असे अल्लाह मला विचारेल. मुस्लिमांच्या संरक्षणासाठी लढणे हे माझे धार्मिक कर्तव्य आहे असे मोहम्मदने आपल्या संदेशात म्हटले आहे.
मी काय करतो आहे त्याची मला पूर्ण कल्पना आहे. इसिसमध्ये भरती होण्यासाठी कोणी माझे विचारपरिवर्तन केलेले नाही. इसिस संदर्भातील बातम्या वाचून इस्लामासाठी लढण्यासाठी म्हणून मी स्वत: घर सोडले असे मोहम्मदने संदेशात म्हटले आहे. इस्लामासाठी लढताना मृत्यू झाला तर, शहीद म्हणून माझी गणना होईल असे मोहम्मद मारवानने आपल्या टेलिग्राम संदेशात म्हटले आहे.